मुंबई : ( Haribhau Bagde ) सैनिक नेहमीच भारतमातेला सर्वस्व अर्पण करण्यास तयार असतात. सैनिक कधीही पूर्व सैनिक होत नाहीत. सैन्यात नसले तरी राष्ट्र उभारणीत ते सक्रिय सहभागी होत असतात. त्यामुळेच सैनिक हा शब्दच नसांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्यासाठी पुरेसा आहे, असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. ते जयपूरच्या आर्मी एरिया सभागृहात अखिल भारतीय माजी सैनिक सेवा परिषदेच्या २६ व्या वार्षिक अधिवेशन उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी त्यांनी सैनिकांच्या कुटुंबियांसाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजसेवा, देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि तरुणांना राष्ट्रसेवेसाठी प्रेरित करणे यासारख्या कार्यातील सक्रिय भूमिकेबद्दल त्यांनी अखिल भारतीय माजी सैनिक परिषदेचे कौतुक केले.
हेही वाचा : अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषदेत कमळ फुलले, गड कोसळला
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख प्रदीप जोशी म्हणाले की, जग वेगाने बदलत आहे आणि संघर्षांचे स्वरूप सतत विकसित होत आहे. आज जगात दोन मोठे संघर्ष स्पष्टपणे दिसून येतात ते म्हणजे संस्कृती आणि उपभोगवाद यांचा संघर्ष होय. याचे परिणाम आपल्या शेजारील बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि म्यानमारमध्ये दिसून येत आहेत आणि भारतातही असेच घडवण्याचे काही देशविघातक प्रवृत्तींचे प्रयत्न सुरू आहेत.