मुंबई : ( Sharif Usman Hadi ) भारतविरोधी नकाशा बनवणारा शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात हिंसाचार वाढला आहे. सिंगापूरहून हादी यांचे पार्थिव आणल्यानंतर परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी ढाका शहरात बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) तैनात करण्यात आले आहेत. बीजीबीने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसर, कारवान बाजार, हॉटेल इंटरकॉन्टिनेंटल झोन आणि राजधानीतील इतर प्रमुख ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
१२ डिसेंबर रोजी ढाकाच्या मध्यवर्ती भागात विजयनगर परिसरात निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. ६ दिवस उपचार घेतल्यानंतर सिंगापूरच्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले. निधनानंतर बांगलादेशात हिंसाचार पेटला आहे.
या सर्व परिस्थितीवर भारत सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. शनिवारी (२० डिसेंबर) रोजी माणिक मिया अव्हेन्यू येथून जुहरच्या नमाजानंतर हादीची अंत्ययात्रा काढण्यात येईल. घरच्यांच्या विनंतीनुसार कवी काझी नजरुल इस्लाम यांच्या कबरीशेजारी हादीच्या पार्थिवाचे दफन करण्यात येईल.
हेही वाचा : उस्मान हादीच्या मृत्यूनंतर २४ तासांत बांगलादेशात काय काय घडलं? वाचा A to Z स्टोरी
बांगलादेशमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय सीमावर्ती राज्यांमध्ये सुरक्षा वाढवली
भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे जीओसी-इन-चीफ लेफ्टनंट जनरल आरसी तिवारी यांनी भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनिया सीमा चौकीला भेट दिली . या भेटीदरम्यान अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला.