मुंबई : ( Sharif Usman Hadi ) गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात राजकीय अस्थिरता आणि हिंसक आंदोलनांनी देश हादरून गेला आहे. शेख हसीना सरकारविरोधातील आंदोलनांनंतर परिस्थिती अधिक चिघळली असून, आता त्यांच्या कट्टर विरोधक आणि भारतविरोधी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूने संपूर्ण बांगलादेशात खळबळ उडाली आहे. हादीच्या मृत्यूनंतर त्याच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरत भारतविरोधी घोषणाबाजी, जाळपोळ आणि हिंसक आंदोलनांना सुरुवात केली असून, देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उस्मान हादी नेमका कोण होता?
उस्मान हादी हा केवळ माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा राजकीय विरोधक नव्हता, तर तो एक प्रखर राष्ट्रवादी आणि उघडपणे भारतविरोधी विचारधारा मांडणारा नेता होता. गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या तथाकथित ‘तरुण क्रांती’ आंदोलनाचे नेतृत्व हादीने केले होते. या आंदोलनामुळे तब्बल १५ वर्षे सत्तेत असलेले शेख हसीना यांचे सरकार कोसळल्याचे सांगितले जाते.आगामी सार्वत्रिक निवडणुकीत उस्मान हादी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार होता, मात्र निवडणुकीपूर्वीच त्याचा मृत्यू झाला आणि संपूर्ण राजकीय समीकरण बदलून गेले.
उस्मान हादीचा मृत्यू कसा झाला?
१२ डिसेंबर रोजी उस्मान हादीने ढाका येथील बिजोयनगर भागातून प्रचाराची सुरुवात केली होती. याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने हादीवर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या हादीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला सिंगापूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान १८ डिसेंबर रोजी उस्मान हादीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच बांगलादेशात एकच खळबळ उडाली.
<!-- Inject Script Filtered -->
मृत्यूनंतर बांगलादेशात हिंसाचार
हादीच्या मृत्यूनंतर राजधानी ढाका येथे हिंसक आंदोलनांना सुरुवात झाली. अनेक भागांत जाळपोळ, तोडफोड आणि आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली. गुरुवारी (१८ डिसेंबर) संतप्त जमावाने ढाकास्थित दोन नामांकित वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ला करून इमारतींना आग लावली. या आगीत अनेक पत्रकार आणि कर्मचारी अडकले होते. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत शिडीच्या सहाय्याने अनेकांचे प्राण वाचवले.
याचदरम्यान, दीपू दास नावाच्या एका हिंदू तरुणाची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ धर्माच्या आधारावर त्याला लक्ष्य करून हत्या करण्यात आली आणि मृतदेह झाडाला लटकवून जाळण्यात आला. या घटनेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजात तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
<!-- Inject Script Filtered -->
भारतविरोधी घोषणाबाजी आणि राष्ट्रीय शोक
हिंसक आंदोलनादरम्यान ढाका आणि इतर भागांत भारतविरोधी घोषणाही मोठ्या प्रमाणावर दिल्या गेल्या. अनेक राजकीय नेत्यांनी आक्रमक आणि चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, बांगलादेशातील युनूस सरकारने उस्मान हादीच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. या काळात सरकारी, निमसरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था तसेच खासगी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आले.