मुंबई : ( Bangladesh ) गुरुवारी रात्री बांगलादेशातील मैमनसिंग शहरात ईशनिंदेच्या आरोपाखाली कट्टरतावादी जमावाने दीपू चंद्र दास या हिंदू तरूणाची मारहाण करून हत्या केली. एका वृत्तवाहिनीने दीपू चंद्र दास यांचे वडील रविलाल दास यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, "आजूबाजूचे बरेच लोक ते म्हणत होते माझा भाऊ... माझा भाऊ, त्याला मारहाण झाली, खूप मारहाण झाली.
अर्ध्या तासानंतर माझे काका आले आणि त्यांनी मला सांगितले की त्यांनी माझ्या मुलाला नेले... काठ्यांनी आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या मृतदेहाला नग्न करून झाडाला बांधले, त्याच्यावर रॉकेल ओतले आणि त्याला आग लावली. त्याचा जळालेला मृतदेह रस्त्यावर टाकण्यात आला होता. हे सर्व अतिशय भयानक आणि काळीज चिरणारे होते" रविलाल दास यांनी यादरम्यान भावनिक होऊन मुलाच्या हत्येचे वर्णन केले.
हेही वाचा : उस्मान हादीचा मृत्यू सरकारसाठी राष्ट्रीय शोक दिन; पत्रकारांसाठी मात्र काळा दिवस
ते पुढे म्हणाले की, दीपू चंद्र मैमनसिंग शहरातील एका कारखान्यात कामगार म्हणून काम करत होता. त्याच्यावर इथल्या काही युवकांनी खोटे आरोप पसरवले की त्याने त्यांच्या धर्माच्या प्रेषिताचा अपमान केला. त्यानंतर जमाव एकत्र आला आणि त्यांनी हल्ला केला. यात कुणीही त्याने खरंच अपमान केलाय का? याची जरादेखील माहिती घेतली नाही. त्याच्यावर करण्यात आलेला आरोप खोटा होता.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात, या लिंचिंगचा निषेध केला असून, "नव्या बांगलादेशात अशा हिंसाचाराला जागा नाही. या जघन्य गुन्ह्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही," असे म्हटले आहे.
तथापि, यावर त्याच्या वडिलांनी सरकारला न्यायासाठी धावून येण्याची विनंती केली आहे. रविलाल दास म्हणाले की, "कुटुंबाला अद्याप कोणतेही थेट आश्वासन मिळालेले नाही. सरकारकडून कोणीही कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिलेले नाही. कोणीही काहीही सांगितले नाही."