मुंबई : ( Usman Hadi ) काही अज्ञातांनी बांगलादेशचा विद्यार्थी नेता आणि इन्कलाब मंचचा संयोजक शरिफ उस्मान हादीची हत्या केल्यानंतर संपूर्ण बांगलादेश हिंसाचारात बुडाला. हल्लेखोरांनी प्रोथम आलो आणि डेली स्टार या माध्यम कार्यालयांची तोडफोड केली. शरिफ उस्मानसाठी बांग्लादेश सरकारने शनिवार (दि. २०) रोजी राष्ट्रीय शोक दिन पाळला असतानाच बांगलादेशातील पत्रकारांनी मात्र त्यांच्याबाबत घडलेल्या घटनेने काळा दिवस असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, हिसांचारात बांगलादेशच्या दोन माध्यम संस्था, प्रोथम आलो आणि द डेली स्टार यांच्या ढाका येथील कार्यालयांवर इस्लामिक कट्टरपंथीयांनी हल्ला, तोडफोड आणि आग लावल्यानंतर दोन्ही वृत्तवाहिन्यांनी स्वतंत्र पत्रकारितेसाठी काळा दिवस असल्याचे सांगितले आहे. तसेच फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी देशाला अस्थिर करण्याचा आणि निवडणुका उधळून लावण्यासाठी हल्ला केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
प्रोथम आलोने याबाबत निवेदन प्रसिद्ध केले असून त्यामध्ये सांगितले आहे की, हल्लेखोरांनी कार्यालयाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आणि नंतर ती पेटवून दिली. दीर्घकाळ चाललेल्या आगीमुळे इमारत जळून खाक झाली आणि महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. २७ वर्षांच्या इतिहासात १९ डिसेंबर रोजी प्रथमच प्रिंट आवृत्ती प्रकाशित करू शकले नाही. त्यात पुढे म्हटले आहे की, स्वतंत्र पत्रकारितेसाठी हा काळा दिवस होता.
प्रथम आलोने याला दहशतवादी हल्ला आणि लोकशाही, प्रेस स्वातंत्र्य आणि मतभेद व्यक्त करण्याच्या अधिकारावर थेट हल्ला असल्याचे संबोधले आणि सखोल चौकशी तसेच न्यायाची मागणी केली. त्याचप्रमाणे द डेली स्टारनेही असेच एक निवेदन प्रकाशित केले आहे, ज्यामध्ये या घटनांना "बांगलादेशातील स्वतंत्र पत्रकारितेसाठी सर्वात काळ्या दिवसांपैकी एक" असे संबोधले आहे.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.