आता टोल थेट बँक खात्यातून कट होणार; केंद्र सरकार फास्टॅग आणि टोल प्लाझा हटवण्याची तयारीत

18 Dec 2025 17:06:12
 
Nitin Gadkari
 
मुंबई : ( Nitin Gadkari ) देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुली व्यवस्थेत मोठा बदल करण्याची तयारी केंद्र सरकार करीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच सर्व टोल प्लाझा आणि फास्टॅग प्रणाली रद्द करण्यात येणार असून थेट वाहनचालकाच्या बँक खात्यातून टोल रक्कम वसूल केली जाणार आहे.
 
या नव्या योजनेसाठी सध्या पायलट प्रोजेक्ट सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ते पुढे असेही म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा हटवण्यासाठी सरकार वेगाने काम करत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे नवीन बदल सरकार करणार आहे. या नव्या योजनेनुसार महामार्गांवर बसवण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांद्वारे वाहनांच्या नंबर प्लेटचा फोटो घेतला जाईल व त्याच आधारे संबंधित वाहनचालकाच्या बँक खात्यातून आपोआप टोलाचे पैसे कट केली जातील. त्यामुळे टोल प्लाझांवरील गर्दी, वेळेची बचत आणि वाहतूक कोंडी टाळता येणार आहे.
 
हेही वाचा : Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचे टायर फुटले; कोचीनमध्ये आपत्कालीन लँडिंग,१६० प्रवासी सुरक्षित
 
या संदर्भात गडकरी पुढे म्हणाले की, “पूर्वी लोक आपल्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट बसवत असत. मात्र, २०१९मध्ये आम्ही नियम केला की कार कंपनीचीच नंबरप्लेट बसवणं अनिवार्य आहे. यामुळे महामार्गांवरील कॅमेऱ्यांना नंबर प्लेट सहज ओळखता येतील. ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, टोल न भरणाऱ्या वाहनधारकांवर दंड किंवा शिक्षेची ठोस तरतूद नसल्याने या योजनेत मोठी अडचण येणार आहे. यासाठी लवकरच आवश्यक कायदेशीर तरतुदी करण्यात येऊ शकते, अशी माहितीही गडकरी यांनी दिली. या योजनेमुळे टोल वसुली पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0