Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचे टायर फुटले; कोचीनमध्ये आपत्कालीन लँडिंग,१६० प्रवासी सुरक्षित

    18-Dec-2025   
Total Views |
Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचे टायर फुटले; कोचीनमध्ये आपत्कालीन लँडिंग,१६० प्रवासी सुरक्षित
 
मुंबई : (Air India Express) जेद्दाहून कोझिकोडला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला गुरुवारी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. या विमानात 1६० प्रवासी प्रवास करत होते.
 
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (CIAL) ने दिलेल्या माहितीनुसार, आयएक्स ३९८ या विमानाला उजव्या बाजूच्या टायरमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कोझिकोडऐवजी कोचीकडे वळवण्यात आले. विमान सकाळी ०९.०७ वाजता पूर्ण आपत्कालीन तयारीत सुरक्षितपणे उतरले.
 
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (CIAL) च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, लँडिंगपूर्वी सर्व आपत्कालीन सेवा सक्रिय करण्यात आल्या होत्या. या घटनेत कोणताही प्रवासी किंवा क्रू सदस्य जखमी झाल्याची माहीती नाही. लँडिंगनंतरच्या तपासणीत विमानाच्या उजव्या बाजूचे दोन्ही टायर फुटल्याची पुष्टी झाली आहे.
 
दरम्यान, एअरलाइनच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, केवळ टायरमध्ये बिघाड झाला होता, लँडिंग गियरमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती. कोझिकोडचे करिपूर विमानतळ हे टेबल-टॉप असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोची येथे खबरदारीची लँडिंग करण्यात आली.
 
करिपूर (कोझिकोड) विमानतळावर आपत्कालीन लँडिंग धोकादायक का? यामागे ५ कारणे...
 
  • धावपट्टी उंच पठारावर असून दोन्ही टोकांना खोल दऱ्या आहेत.
  • धावपट्टीची लांबी मर्यादित असल्याने विमान थांबवण्यासाठी कमी अंतर.
  • ओव्हर-शूट झाल्यास विमान थेट उतारावर जाण्याचा धोका असल्याने अपघात होऊ शकतो.
  • मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि कमी दृश्यमानता ही अनेकदा आव्हान ठरते, ज्यामुळे आपत्कालीन स्थितीत धोका आणखी वाढतो.
  • सुरक्षिततेचे अंतर कमी असल्याने वैमानिक जवळच्या मोठ्या विमानतळांना प्राधान्य देतात
 
प्रवाशांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था
 
सर्व प्रवाशांना विमानतळाच्या लाउंजमध्ये थांबवण्यात आले आहे आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी व्यवस्था केली जात आहे. विमानाला उशीर झाल्यास किंवा रद्द झाल्यास, एअर इंडिया एक्सप्रेसने आश्वासन दिले आहे की प्रवाशांना रस्तेमार्गे कोझिकोडला नेले जाईल, जे कोचीपासून सुमारे सात तासांच्या अंतरावर आहे.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.