कार्तिगाई दीपम वादावर उच्च अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

11 Dec 2025 15:09:05
 
 Tamil Nadu
 
मुंबई : (Court Orders Tamil Nadu Officials Over Temple Lighting ) मदुराई येथील प्रसिद्ध थिरुपरंकुंड्रम मुरुगन मंदिरात कार्तिगाई दीपम उत्सवादरम्यान टेकडीवर पारंपारिक दिवे लावण्याच्या वादावर सुनावणी झाली. यावेळी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जीआर स्वामीनाथन यांनी, त्यांच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल तामिळनाडूचे मुख्य सचिव डीजीपी, मदुराईचे जिल्हाधिकारी आणि पोलिस उपायुक्तांसह उच्च अधिकाऱ्यांना न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे निर्देश देणारा कडक आदेश जारी केला.
 
न्यायालयाच्या अवमानाच्या कारवाईबाबत वकील कार्तिकयन एन यांनी माध्यमांना सांगितले की, मदुराईच्या पोलिस उपायुक्तांना एक वैधानिक नोटीस बजावण्यात आली आहे. ज्यामध्ये त्यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का सुरू करू नये अशी विचारणा करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, अधिकारी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
हेही वाचा : विविधतेतून उभी राहणारी राष्ट्रभावना हीच हिंदू राष्ट्रभावना होय; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
 
संपूर्ण प्रकरण काय आहे?
 
१ डिसेंबर रोजी न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी मंदिर व्यवस्थापनाला ३ डिसेंबर रोजी कार्तिगाई दीपम उत्सवादरम्यान तिरुपरंकुंड्रम टेकडीवरील दगडी खांबावर दिवा लावण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. तथापि न्यायालयाच्या आदेशानंतरही तशी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे हिंदू मक्कल काची, हिंदू तमिझर काची, हनुमान सेनाई आणि हिंदू मुन्नी या चार हिंदू संघटनांच्या सदस्यांची द्रमुक सरकारच्या प्रशासनासोबत जोरदार झटापट झाली. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी न्यायालयाने अवमान याचिका स्वीकारली आणि कार्तिगाई दीपम उत्सवादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला प्रतिबंधात्मक आदेश रद्द केला.
 
 
Powered By Sangraha 9.0