मुंबई : ( Mohan Bhagwat ) “भारत हे सनातन राष्ट्र आहे. आपली राष्ट्रीय ओळख ही विविधतेचा स्वीकार करणारी आहे. विविधता ही आपली ताकद आहे आणि त्या विविधतेतून उभी राहणारी राष्ट्रभावना हीच हिंदू राष्ट्रभावना आहे”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
संघशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या भाग म्हणून सरसंघचालकांनी चेन्नईतील युवा कार्यकर्ते आणि बुद्धिजीवींना संबोधित केले. '100 इयर्स सागा ऑफ आरएसएस - एनव्हिजनिंग द वे फॉरवर्ड' या शीर्षकाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांनी संघाचा इतिहास, ध्येय, उद्देश, आगामी दिशा, तसेच आजच्या तरुणांकडून देश आणि समाजाच्या अपेक्षा यांवर सविस्तर भाष्य केले. त्यानंतरच्या संवादात्मक सत्रात त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक म्हणाले, कोणत्याही देशात स्वातंत्र्य आणि समानता टिकण्यासाठी समाजाचे एकात्मिक असणे अत्यावश्यक आहे. संघ ही काही प्रतिक्रिया देणारी संस्था नाही. ती कोणाच्या विरोधात नाही आणि कोणाशी स्पर्धाही करत नाही. संघाला शक्तिशाली संस्था बनायचे नाही, तर संपूर्ण समाज एकत्र आणायचा आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून भारताला विश्वगुरू बनवणे हा संघाचा एकमेव हेतू आहे.
पुढे ते म्हणाले, हिंदूंनी संघटित होऊन मातृभूमीची सेवा करणे अत्यावश्यक आहे. राष्ट्र म्हणजे केवळ ‘नेशन-स्टेट’ नव्हे; राष्ट्र म्हणजे आपली संस्कृती, परंपरा आणि वारसा. धर्म हा पूजा नसून, जो जोडतो आणि उन्नतीकडे नेतो तो धर्म आहे. आपल्या पुढच्या पिढीला संस्कृतीचा अभिमान वाटावा, यासाठी आधी सध्याच्या पिढीला देशाचा अभिमान वाटणे आवश्यक आहे.
मंदिरांबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना सरसंघचालकांनी सांगितले की मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे असावे, आणि ते समाजकार्याचे केंद्र बनावे. निधी भक्तांच्या सेवेसाठी वापरला जावा. न्यायालयांचाही यावर समान मत आहे. पण हे काम कोण घेणार आणि ते कसे चालवणार, यासाठी सक्षम यंत्रणा तयार करावी लागेल.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक