अनंत अंबानींना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड; वनतारा उपक्रमाची जागतिक स्तरावर प्रशंसा

10 Dec 2025 13:42:34

Anant Ambani Wins Global Humanitarian Award
 
मुंबई : ( Anant Ambani Wins Global Humanitarian Award ) अमेरिकन ह्यूमेन सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय शाखा ग्लोबल ह्युमेन सोसायटीने वनतारा उपक्रमाचे संस्थापक अनंत अंबानी यांना प्रतिष्ठित ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड प्रदान केला. वन्यजीव संवर्धनातील प्रभावी नेतृत्वामुळे अंबानी यांची निवड झाली असून, ते या पुरस्काराचे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई मानकरी ठरले आहेत.
 
ग्लोबल ह्युमेन सोसायटीच्या मते, वनतारा हे मोठ्या प्रमाणावरील वन्य प्राण्यांचे बचाव, पुनर्वसन, उपचार आणि प्रजाती संवर्धन क्षेत्रात जगातील अग्रगण्य केंद्र मानले जाते. या उपक्रमाला मिळालेला Global Humane Certified™ दर्जा हा जागतिक पातळीवरील सर्वात कठोर आणि व्यापक पशुकल्याण प्रमाणपत्रांपैकी एक आहे. प्रमाणन प्रक्रियेत पोषण, पर्यावरण, सुरक्षितता, नैसर्गिक वर्तन, वैद्यकीय देखभाल आणि प्रशिक्षित कर्मचारी अशा अनेक घटकांचे मूल्यांकन केले जाते.
 
हेही वाचा : अंबुजा सिमेंट्सला पहिल्या इंडो-स्वीडिश CCU प्री-पायलट अभ्यासासाठी निवड
 
पुरस्कार स्वीकारताना अनंत अंबानी म्हणाले, “ही मान्यता ‘सर्व भूत हिते’ या तत्त्वाचे महत्व पुनर्स्थापित करते. वनतारा प्रत्येक जीवाला सन्मान, आशा आणि काळजी देण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे. संवर्धन हे उद्याचे नव्हे, आजचे आपले सामायिक कर्तव्य आहे.”
 
या कार्यक्रमाला जागतिक संवर्धन क्षेत्रातील अनेक प्रमुख तज्ज्ञ, वैज्ञानिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यापूर्वी हा पुरस्कार हॉलीवूड दिग्गज शर्ली मॅकलेन, जॉन वेन, बेट्टी व्हाईट तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी आणि बिल क्लिंटन यांना मिळाला आहे.
 
अमेरिकन ह्यूमेन सोसायटी मागील १५० वर्षांहून अधिक काळ पशुकल्याण चळवळीत कार्यरत असून, जगभरातील एक अब्जांपेक्षा जास्त प्राण्यांच्या कल्याणाचे प्रमाणन करते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0