महाड: (Pravin Darekar) महाड येथे प्रभाग क्र.६ च्या भाजपा, राष्ट्रवादी युतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या उपस्थितीत गवळवाडी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत आ. दरेकर यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसूख घेतले. महाडमधील निवडणूक दंडेलशाहीचे राजकारण व सुसंस्कृत राजकारण अशा प्रकारची आहे. ही लढाई संवेदनशील नेतृत्व व दुसरीकडे संवेदना नसणारे राजकारणी यांच्यातील असून विरोधकांची मानसिकता राजकारणात दंडेलशाहीचा वापर करून, लोकांवर दबाव आणून निवडणूक जिंकू शकतो ही आहे. ही दंडेलशाही उखडून टाकू हे सांगणारी महाडमधील निवडणूक असल्याचा घणाघात आ. दरेकर (Pravin Darekar)यांनी सभेत केला.
याप्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, भाजपा नेते बिपीन म्हामुणकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदेश कळमकर, अपेक्षा कार्यकारी, भाजपा तालुकाध्यक्ष निलेश तळवटकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक, सुप्रिया देशमुख, माजी नगरसेवक सुप्रिया धुमाळ, माजी नगरसेवक अशोक पवार, नीता शेठ, नीलिमा भोसले, प्रभाग क्र. ६ चे उमेदवार सुरज बामणे (भाजपा), प्रज्ञा गांधी (राष्ट्रवादी) यांसह भाजपा व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी सभेत बोलताना आ. दरेकर (Pravin Darekar) म्हणाले कि, ही निवडणूक ऐतिहासिक अशी होत आहे. महाड शहराला वैभव, परंपरा आहे. राज्यात महायुतीत आम्ही सरकारमध्ये आहोत. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी असे आमचे सरकार आहे. अशा वेळी या सरकारमधील एक भिडू आमच्यासोबत नाही. ते आमच्या फायद्याचे असून महाडमधील जनता आम्हाला निवडून देणार आहे. या शहराची ओळख स्नेहल जगताप आणि बिपीन म्हामुणकर यांच्या नावाची आहे. काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः फोन करून भाजपाच्या कमळासोबत राष्ट्रवादीलाही विजयी करा असे आवाहन केले. दौऱ्यावर असतानाही त्यांना महाडची काळजी आहे. ती लोकं या व्यासपीठावर असल्याचेही दरेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि, राज्यात अनेक नगरपालिका आहेत. परंतु या नगरपालिकेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याचा इतिहास आहे. छत्रपतींचे नाव घेऊन आम्ही काम करतो ती विश्वासाने राजधानी रायगड किल्ल्यावर महाराजांनी केली. ही विश्वासू माणसांची भूमी आहे. विश्वास चांगल्या लोकांवर ठेवायचा. युवा नेते बोलले घड्याळासाठी भाजपाला प्रचार करावा लागतोय. त्यांनी भाजपाला खूप हलक्यात घेतलेय. तुम्ही महाडच्या बाहेर जात नाही. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे शिवसेना हाताचा प्रचार करतेय. काँग्रेसच्या हातासोबत युती आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेले एक वेळ मी शिवसेना बंद करेन पण काँग्रेससोबत जाणार नाही. उद्धव ठाकरेंना सांगितलेले तुम्ही काँग्रेससोबत जाताय म्हणून आम्ही उठाव करतोय. मग उमरग्याची तुमची काँग्रेससोबत जाण्याची भूमिका का? याचे उत्तर महाडवासियांना देणार का? असा सवालही दरेकरांनी (Pravin Darekar) केला.
तसेच दरेकर (Pravin Darekar) म्हणाले कि, येथील युवक व महिलांनी ठरवलेय. जेव्हा महिला सभेला येतात, रस्त्यावर उतरतात तेव्हा त्या पक्षाचा विजय निश्चित असतो. जातीपतीच्या पलीकडे निवडणुका जिंकून येतात हे बिहारमधील युवा व महिलांनी दाखवून दिलेय. आपल्याला युवा, महिलांसाठी काम करायचेय. उद्योजकता कौशल्य विकास केंद्र येथे सुरु करा. २५ ते ५० कोटी रुपये महिला बचत गटांच्या छोट्या व्यवसायासाठी मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी देऊ,असे आश्वासनही दरेकरांनी यावेळी दिले. तसेच भाजपा आणि राष्टवादी युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही यावेळी दरेकरांनी (Pravin Darekar) महाडवासियांना केले.
भाजपा राष्ट्रीय पक्ष, त्याला हलक्यात घेऊ नये
दरेकर (Pravin Darekar) पुढे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणाची दिशा बदलून टाकलीय. देशाला विकासाचे राजकारण त्यांनी दाखवले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या राजकारणावर निवडणुका जिंकता येतात हे दाखवले. ही महाडकरांच्या सन्मानाची लढाई आहे. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा आहे. त्याला हलक्यात घेऊ नये, असा इशाराही दरेकरांनी (Pravin Darekar) विरोधकांना दिला.