पाकिस्तानच्या विरोधात भारताची नवीन रणनीती!

    30-Nov-2025
Total Views |
 
India
 
देशात युद्धक्षेत्रात सातत्याने नवीन तंत्रज्ञान येत असते. त्यामुळे युद्धनीतीमध्ये आपल्याला बदल करणे अनिवार्य होते. भारतानेही सातत्याने युद्धनीतीबाबत परिवर्तनीय दृष्टिकोन स्वीकारला आहे.‘कोल्ड स्टार्ट डॉट्रिन’ ते ‘कोल्ड स्ट्राईक’ पर्यंतची वाटचाल या भूमिकेचे एक उदाहरणे ठरावे. हा झालेला बदल नेमका काय, त्याचा सैन्याच्या सामर्थ्यावर पडणारा प्रभाव याचा घेतलेला आढावा...
 
भारतीय सैन्याच्या युद्धनीतीमध्ये होणारे बदल, देशाच्या सुरक्षा धोरणाचे आणि क्षेत्रीय भू-राजकीय बदलांचे स्पष्ट प्रतिबिंब आहेत. विशेषतः, पाकिस्तानच्या सीमेवरील आव्हाने आणि युद्धाच्या बदलत्या स्वरूपामुळे, भारताला आपल्या सैन्यक्षमतेचा आणि कारवाईच्या वेगाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. ’ऑपरेशन सिंदूर’ आणि २००१ च्या संसदेवरील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने जी ’कोल्ड स्टार्ट डॉट्रिन’ विकसित केली, ती आता ’कोल्ड स्ट्राईक’ या अधिक वेगवान, गुप्तचरआधारित आणि एकीकृत युद्धनीतीकडे वाटचाल करत आहे. या बदलाचा उद्देश आहे , शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे, सैनिकी तुकड्यांची लवचीकता वाढवणे आणि कमी वेळेत, कमी साधनसंपत्ती वापरून निर्णायक विजय मिळवणे.
 
’कोल्ड स्टार्ट डॉट्रिन’ची पार्श्वभूमी आणि मर्यादा : 
 
२००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ’ऑपरेशन पराक्रम’ अंतर्गत पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य जमवण्यास सुरुवात केली. परंतु, या प्रक्रियेला एक महिन्याहून अधिक काळ लागला. इतका मोठा वेळ मिळाल्याने, आंतरराष्ट्रीयस्तरावर हस्तक्षेप होण्याची शयता वाढली आणि पाकिस्तानलाही आपली बचाव यंत्रणा सज्ज करण्याची संधी मिळाली. या अनुभवातूनच ’कोल्ड स्टार्ट डॉट्रिन’चा जन्म झाला.
 
’कोल्ड स्टार्ट डॉट्रिन’ अर्थात ’सीडीएस’ म्हणजे काय? ’सीडीएस’ची मूळ कल्पना अशी होती की, मोठ्या सैन्य तुकड्यांना एकत्र आणण्याऐवजी, छोट्या, स्वयंपूर्ण आणि एकत्रित लढाऊ गटांचा वापर करून, पाकिस्तानच्या आण्विक हल्ल्याच्या सीमेखाली राहूनच वेगवान खोलवर हल्ला करणे. याचा उद्देश पाकिस्तानला झपाट्याने मोठे नुकसान पोहोचवणे हा होता.
 
’सीडीएस’च्या मर्यादा सैन्य जमावण्याचा वेळ : ’सीडीएस’ने कारवाईचा वेळ कमी केला असला, तरीही पूर्ण ताकदीने हल्ला चढवण्यासाठी काही दिवसांचा वेळ अनिवार्यच होता.
 
संरचनात्मक जडत्व : मोठ्या प्रमाणावर असलेल्या पारंपरिक सैन्याच्या संरचनेत, आवश्यक वेग आणि लवचीकता आणणे हे सुद्धा एक आव्हानच होते.
 
आंतरराष्ट्रीय दबाव : कोणत्याही मोठ्या कारवाईत, आंतरराष्ट्रीय दबाव आणि मध्यस्थीची शयता कायम राहते.
 
’कोल्ड स्ट्राईक’ : नवीन युगाची गरज
 
’कोल्ड स्ट्राईक’ ही नीती ’कोल्ड स्टार्ट’च्या मूळ तत्त्वज्ञानाला अधिक धारदार, वेगवान आणि तंत्रज्ञानआधारित बनवते. ही नीती आधुनिक युद्धाच्या मागण्या पूर्ण करते, जिथे अचूक गुप्तहेर माहिती, त्वरित कारवाई करण्याची क्षमता आणि एकीकृत शस्त्र प्रणाली निर्णायक ठरताना दिसते.
 
’ऑल आर्म्स’ ‘रुद्र ब्रिगेड’ची निर्मिती : ’ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सैन्याने केलेल्या सर्वात मोठ्या बदलांपैकी एक म्हणजे, ’रुद्र ऑल आर्म्स ब्रिगेड’ची निर्मिती आणि त्यांचा ’त्रिशूल’ यासारख्या युद्धसरावात केलेला वापर.
 
‘रुद्र ब्रिगेड’ची वैशिष्ट्ये :
 
एकीकृत रचना : या ब्रिगेडमध्ये चिलखती युनिट्स, तोफखाना, विशेष दल, इंजिनिअर्स, सिग्नल युनिट्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवरहित हवाई प्रणाली यांचा समावेश करण्यात आला आहे.
 
गुंतागुंत कमी : पारंपरिक युद्धात वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय साधण्यात, वेळ आणि ऊर्जा खर्च होते. ‘रुद्र ब्रिगेड’मध्ये सर्व विभाग कायमस्वरूपी एकत्र असल्याने, निर्णयक्षमता आणि कारवाईचा वेग वाढतो.
 
लवचीकता : ब्रिगेड कमांडरला त्याच्या गरजेनुसार, सर्व आवश्यक संसाधने एकाच वेळी उपलब्ध होतात. यामुळे त्याला तत्काळ परिस्थितीनुसार प्रतिसाद देणे सहजपणे शय होते.
 
प्रशिक्षण आणि भूगोलाशी जुळवून घेणे : सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या ब्रिगेडना विशिष्ट भौगोलिक प्रदेशानुसार प्रशिक्षित केले जात आहे.
 
वाळवंटी युद्ध : भारत-पाकिस्तान सीमेवरील वाळवंटी प्रदेशासाठी, विशेषतः चिलखती ताकदीवर आणि जलद हालचालींवर लक्ष केंद्रित करणे.
 
डोंगराळ युद्ध : भारत-चीन सीमेवरील उंच पर्वतांसाठी हलका तोफखाना, विशेष पर्वतारोहण तुकड्या आणि ड्रोन यांचा प्रभावी वापर करणे.
 
मैदानी प्रदेश : पंजाब सीमेवरील मैदानी प्रदेशांसाठी टॅन्स, पायदळ आणि हवाई सहकार्याचा प्रभावी समन्वय साधणे.
सध्याच्या माहितीनुसार, भारतीय सैन्य २५० हून अधिक ‘सिंगल-आर्म्स ब्रिगेड’चे रूपांतर ’ऑल आर्म्स रुद्र ब्रिगेड’मध्ये करत आहे, जे या धोरणाची व्याप्ती दर्शवते.
 
भैरव बटालियन ः वेगवान, विशिष्ट मिशनसाठी ‘भैरव बटालियन’ या लहान पण; विशेष मोहिम दलाची स्थापना करण्यात आली आहे. याची प्रातिनिधिक संरचना सुमारे २५० जवानांची असून, ते पारंपरिक इन्फंट्री आणि स्पेशल फोर्सेस यांच्या मधल्या आकाराचे आहेत.
 
या दलाचे उपयोग :
 
जलद रणनीतिक छापे आणि सीमावर्ती ऑपरेशन्स
 
बंडखोरीविरोधी आणि सर्जिकल स्ट्राइस
 
ड्रोन-समाकलनाद्वारे निगराणी व लक्ष्य निश्चिती
 
या बटालियनचे प्रशिक्षण शहरी युद्ध, बहुडोमेन समन्वय आणि ड्रोनआधारित युद्धावरही केंद्रित करण्यात आले आहे.
 
गुप्तहेर माहितीचा आधार : ’कोल्ड स्ट्राइक’ नीतीचा कणा आहे ’इंटेलिजन्स-फ्यूजन’. आता केवळ मोठ्या प्रमाणावर सैन्यबळ वापरण्याऐवजी, गुप्तचर माहितीच्या आधारावर ’पिनपॉईंट’ हल्ले करणे अपेक्षित आहे.
 
यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल :
 
रिअल-टाईम पाळत : उपग्रह, ड्रोन, आणि मानवी गुप्तहेर माहितीच्या माध्यमातून, शत्रूच्या हालचालींवर त्वरित आणि सतत लक्ष ठेवणे.
 
लक्ष्य निश्चिती : अचूक लक्ष्य निश्चित करून, कमीत-कमी नुकसान होईल याची खात्री करणे.
 
सायबर आणि इलेट्रॉनिक युद्ध : शत्रूची संपर्क साधने निकामी करणे आणि त्यांच्या निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण करणे, ज्यामुळे कारवाई अधिक वेगवान होणे शक्य होते.
 
कारवाईचा वेग : ’कोल्ड स्ट्राईक’चा मुख्य उद्देश, लवकरात लवकर हल्ला करणे हा आहे. ही ब्रिगेड कायमस्वरूपी युद्धसज्ज अवस्थेत तैनात असेल. गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर, ’रुद्र ब्रिगेड’ला हालचाल करण्यासाठी काही तासांचा अवधी पुरेसा ठरणार आहे.
 
’कोल्ड स्ट्राईक’चे महत्त्व आणि संभाव्य परिणाम : 
 
विश्वासार्ह प्रतिबंध : जेव्हा शत्रूला हे माहीत असते की, प्रत्युत्तर देण्यास भारताला जास्त वेळ लागणार नाही आणि त्याचे स्वरूप अधिक विनाशकारी असेल, तेव्हा तो कोणतेही गैरकृत्य करण्यापूर्वी दहावेळा विचार करेल. ’कोल्ड स्ट्राईक’ पाकिस्तानच्या ’प्रोसी वॉर’ आणि दहशतवादी कारवायांना, त्वरित आणि निर्णायक प्रतिसाद देण्याची क्षमता देते.
 
‘आण्विक थ्रेशोल्ड’चे व्यवस्थापन :
 
’कोल्ड स्ट्राईक’ नीती पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यासाठी प्रवृत्त न करता, त्याचे लक्षणीय नुकसान करेल. हे भारताला पाकिस्तानच्या आण्विक छायेच्या खाली राहूनच, कारवाई करण्याची लवचीकताही देते.
 
चीन सीमेवरही उपयुक्तता : 
 
’रुद्र ब्रिगेड’ची भौगोलिक लवचीकता केवळ पाकिस्तान सीमेपुरतीच मर्यादित नसून, भारत-चीन सीमेवरील डोंगराळ प्रदेशातही तितकीच उपयुक्त आहे. चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सैन्याला त्वरित तैनात करण्याची आणि युद्ध करण्याची या ब्रिगेडची क्षमता भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
 
आव्हान आणि पुढील वाटचाल
 
’कोल्ड स्ट्राईक’ नीतीसमोरील आव्हाने: मानवी संसाधनांचे प्रशिक्षण : नवीन ’ऑल आर्म्स’ संरचनेत काम करण्यासाठी जवानांना आणि अधिकार्‍यांना उच्चस्तरीय, बहुआयामी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
 
तंत्रज्ञान एकत्रीकरण : ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबरक्षमतांना पारंपरिक युनिट्समध्ये अखंडपणे जोडणे, हे मोठे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय आव्हान आहे.
 
अर्थसंकल्पीय पाठिंबा : या बदलांसाठी प्रचंड आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे, विशेषतः आधुनिक उपकरणे आणि शस्त्र प्रणालींसाठी याची गरज आहे.
 
गुप्त माहितीची अचूकता : ही नीती पूर्णपणे गुप्तचर माहितीवर अवलंबून असल्याने, त्या माहितीची अचूकता आणि त्यावरचा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
भारताच्या युद्धनीतीतील हा बदल, जागतिक पातळीवरही महत्त्वाचा ठरतो. भारत आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात, सर्वात प्रगत देश आहे.
 
निष्कर्ष
 
भारतीय सैन्याची ’कोल्ड स्टार्ट’पासून ’कोल्ड स्ट्राइक’कडे झालेली वाटचाल केवळ युद्धनीतीतील बदल नाही, तर आधुनिक भारताच्या सुरक्षा संकल्पनेतील एक मूलभूत परिवर्तन आहे. ’रुद्र ऑल आर्म्स ब्रिगेड’ हे या परिवर्तनाचे मूर्तिमंत उदाहरण. ही नवीन नीती केवळ युद्ध करण्याची पद्धत बदलणार नाही, तर क्षेत्रीय सुरक्षेच्या समतोलावरही दूरगामी परिणाम करेल. ही नीती भारताला भविष्यातील सुरक्षा आव्हानांसाठी अधिक सज्ज, अधिक वेगवान आणि अधिक निर्णायक बनवेल. यामुळे भारताची क्षेत्रीय महाशक्ती म्हणून असलेली भूमिका, अधिकच मजबूत होईल.
 
- (नि.) ब्रि. हेमंत महाजन