मुंबई : (Cyclone Ditwah) दितवाह चक्रीवादळामुळे गेल्या काही तासांपासून तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच आता पावसाशी संबंधित घटनांमध्ये तामिळनाडूमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येत आहे. तूतीकोरिन आणि तंजावरमध्ये भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे, तर मयिलादुथुराईमध्ये एका २० वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. (Cyclone Ditwah)
तामिळनाडूचे वन मंत्री के. रामचंद्रन यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, किनारी भागात २३४ झोपड्या आणि मातीच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्याव्यतिरिक्त, १४९ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यासोबतच अंदाजे ५७,००० हेक्टर शेती जमीन पाण्याखाली गेली आहे. (Cyclone Ditwah)
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत कहर केल्यानंतर, चक्रीवादळ दितवाह (Cyclone Ditwah) रविवार दि. ३० नोव्हेंबरला संध्याकाळी तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हवामान खात्याने कुड्डालोर, नागापट्टिनम, मयिलादुथुराई, विल्लुपुरम आणि चेंगलपट्टूसह अनेक भागाना जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Cyclone Ditwah)
तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे शनिवारी ५४ उड्डाणे रद्द करण्यात आली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह २८ हून अधिक आपत्ती प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय, महाराष्ट्र आणि गुजरातमधील एनडीआरएफ तळांवरून १० पथके चेन्नईत दाखल झाली आहेत. (Cyclone Ditwah)