मुंबईतील चेंबूरच्या कालीमाता मंदिरातील मूर्तीला चक्क मदर मेरीच्या स्वरुपात रुपांतरित केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. पण, ही घटना केवळ एका मंदिरापुरती मर्यादित नाही; तर ती संपूर्ण हिंदू समाजाला खडबडून जागं करणारी आहे. श्रद्धास्थानांमध्ये घुसखोरी, भ्रम निर्माण करणार्या पद्धती आणि गरीब-वंचित समाजाच्या असुरक्षिततेचा गैरफायदा घेणार्या प्रवृत्ती, या सर्वांनी मिळून निर्माण केलेल्या परिस्थितीकडे आता दुर्लक्ष करणे कदापि परवडणारे नाही. धर्मस्वातंत्र्याच्या चौकटीत राहूनही धर्मांतराच्या नावाखाली खेळल्या जाणार्या या धोकादायक खेळी म्हणूनच हिंदू समाजाने समजून घेण्याची आणि त्यावर वेळीच कृती करण्याची नितांत गरज आहे.
चेंबूरमधील कालीमाता मंदिरात देवीच्या प्रतिमेला ख्रिश्चन धर्मातील मदर मेरीचे स्वरुप दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक स्तरावर मोठी खळबळ उडाली. धार्मिक श्रद्धेला धक्का देणार्या कोणत्याही कृतीकडे समाज संवेदनशीलतेने पाहतो; परंतु अशी ही पहिलीवहिली घटना नसून, यापूर्वीही देशाच्या वेगवेगळ्या भागांत धार्मिक चिन्हांमध्ये बदल किंवा चुकीच्या पद्धतीने धार्मिक प्रभाव टाकण्याचे प्रयत्न झाल्याची उदाहरणे दिसतात.
खरं तर आजही सामाजिक-आर्थिक असुरक्षितता समाजात दिसून येते. दलित, वंचित व मागासवर्गीय लोकांची स्थिती चांगली नाही. आर्थिकदृष्ट्या खूप कमजोर असल्यामुळे ख्रिस्ती मिशनरी अशा लोकांचा गैरफायदा घेतात आणि त्यांना प्रार्थनासभेला येऊन येशूसमोर प्रार्थना करून, त्यांची समस्या येशू सोडवू शकतो, अशाप्रकारे दिशाभूल करून शेवटी धर्मांतर घडवून आणतात. पण, हिंदू समाजात याविषयी अपेक्षित अशी भावनिक आणि आध्यात्मिक प्रतिक्रिया उमटताना फारशी दिसत नाही. कारण, हिंदू समाजात अजूनही अशा गैरप्रकारांविषयी जनजागरणाचा मोठा अभाव आहे आणि लोकांना पाहिजे तसे आध्यात्मिक ज्ञान मिळत नाही. काही मठाधीश ठरावीक लोकांना प्राधान्य देतात आणि बाकीच्या लोकांकडे फारसे लक्ष देत नाही, हे कटू सत्य. म्हणूनच अशा हिंदूविरोधी शक्ती चुकीची माहिती आणि हिंदूंच्या अज्ञानाचा वापर करुन सनातन धर्माबद्दल अपप्रचार करताना दिसतात आणि अशा कृत्यांना विरोध करण्यासाठी पुढाकार घेणारेही तसे मोजकेच. तसेच, हिंदू धर्माचे जे संत-महंत आहेत, ते सगळे वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा विचार मांडतात, म्हणून अनेकदा सर्वसामान्यांसमोर धर्म-संस्कृती विषयक प्रश्न निर्माण होतात.
देशभरातील ग्रामीण व आदिवासी भागात, तसेच तामिळनाडू, वसई, पालघर, डहाणू, मीरा-भाईंदर, छत्तीसगढ, झारखंड व मध्य प्रदेशातील आदिवासी परिसरात ख्रिस्ती धर्मांतरणाची अनेकदा उदाहरणे दिसून येतात. आदिवासी भागात हिंदूंच्या गळ्यातील लॉकेट पाण्यात बुडते आणि ख्रिश्चनांचा क्रॉस पाण्यात बुडत नाही, असा आभास निर्माण केला जातो. ‘तुमचा देव कसा आहे की, तो पाण्यात बुडून जातो आणि आमचा क्रॉस बुडत नाही, म्हणून जो देव स्वतःची रक्षा करू शकत नाही, तो तुमची रक्षा कशी काय करणार?’ असा चलाखीने अपप्रचार करीत, आदिवासी भागात, तसेच दलित, वंचित बहुजन समाजाला धर्मांतरणासाठी प्रवृत्त केले जाते.
पण, मग हिंदू बांधव या सगळ्याला बळी का पडतात, याबाबत विचार केल्यास ‘आर्थिक गरज’ ही त्यामागची सर्वांत महत्त्वपूर्ण बाब म्हणून समोेर येते. तसेच हिंदूंमधील धार्मिक शिक्षणाचा अभाव, हेदेखील त्यामागचे खूप मोठे कारण ठरते. हिंदूंमध्ये तशी सहिष्णुता खूप असते. म्हणून ते दुसर्या धर्माबद्दल चांगला भाव ठेवतात आणि त्याचाच गैरफायदा हे ख्रिस्ती मिशनरी, तसेच इस्लामिक राष्ट्रांची विचारधारा पाळणारे लोक घेत असतात. या सर्वांपासून हिंदूंना सावध करायचे असेल, तर मंदिर समित्यांचे सुशासन वाढले पाहिजे आणि मंदिरे प्रमुख भूमिकेत त्या त्या भागांत हिंदूंसाठी जनजागृती करायला पुढे आली पाहिजेत. मंदिरातही पुजारी व सेवक यांची पडताळणी करणे तितकेच आवश्यक आहे. समाजातील गरीब व वंचितांना स्वतः मदत करणे आणि त्यांना मंदिराच्या समितीमध्ये प्रमुख भूमिकेत सहभागी करुन घेणे, त्यांना समान दर्जा देणे, हे यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
कायद्याच्या चौकटीत राहूनच समाजात होणारी धर्मांतरे थांबवायला हवीत. संविधानातील ‘कलम २५’ धार्मिक स्वातंत्र्य जरुर देते; पण दुसर्याचे धार्मिक स्वातंत्र्य हिसकावून नाही. जिथे धर्मपरिवर्तनात बळजबरी, लोभ, फसवणूक आहे; तेथे असे गैरकृत्य करणार्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे. त्यांच्याविरोधात पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करून त्यांना शिक्षा होईल, याचीही पुरेपूर तजवीज केली पाहिजे. म्हणूनच आज देशभरात धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता आहे. कारण, जेव्हा मिशनरी किंवा अन्य धर्मीय लोक हिंदूंचे धर्मांतर करतात, तेव्हा कायद्यात याविरोधात कोणतेही ‘कलम’ नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत नाही. म्हणून देशभरात खूप कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची सक्त गरज आहे. तसेच कायद्यांतर्गतच कोणतीही नोटीस न देता, अशा प्रकरणात सहभागी आरोपींना अटक करण्याची मुभा असली पाहिजे, तेव्हाच असे हिंदूविरोधी प्रकार थांबवता येईल.
हिंदू धर्मियांपेक्षा अन्य धर्मियांची धार्मिक संरचना अधिक एकसंध, शिस्तबद्ध आणि नियंत्रणाखाली असते. त्यामुळे अशा धर्मांमध्ये विघातक बदल करणे हे कठीण असते, हे देखील लक्षात घ्यायला हवे. एकूणच काय तर, चेंबूरमधील कालीमाता मंदिरातील ही घटना संपूर्ण हिंदू समाजामध्ये याबाबतीत किती जागरूकतेची गरज आहे, हे दर्शविते. हिंदू समाजाचे सशक्तीकरण करणे, मंदिर व्यवस्थापन सक्षम करणे आणि कायद्याने गैरप्रकारांना आळा घालणे, हेच या धर्मांतरणाच्या समस्येवरील उपाय आहेत. श्रद्धा ही वैयक्तिक आणि स्वेच्छेने असावी; भीती, आमिष किंवा फसवणुकीने ती मिळवता येत नाही. चेंबूरच्या कालीमाता मंदिरात देवीच्या प्रतिमेवर दुसर्या धर्माशी निगडित प्रतिमा लावण्याचा प्रकार हा केवळ धार्मिक विटंबना नसून, पूर्वनियोजित धार्मिक प्रभाव निर्माण करण्याचा गंभीर प्रयत्न असल्याची शयता कदापि नाकारता येत नाही.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या घटनेमागे काही ठरावीक प्रकारचे धर्मप्रचार करणारे गट कार्यरत असतात, जे आपल्या ‘सेवा’ उपक्रमांच्या आडून गरीब आणि वंचित हिंदू समाजातील लोकांना लक्ष्य करतात. गरिबी, आरोग्य, अन्नधान्य, शिक्षण यांचा फायदा घेत, काही गट अप्रत्यक्ष दडपण व आकर्षण निर्माण करून लोकांवर धार्मिक प्रभाव टाकतात. ही मंडळी संविधानाला मानत नाहीत आणि संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे वागतही नाहीत, फक्त आणि फक्त त्याचा गैरवापर करतात. मिशनर्यांना ठावूक आहे की, धर्मांतरविरोधी कायदा भारतात नाही. म्हणून, हे लोक शिक्षा, सेवा व स्वास्थ्य याचा आधार घेऊन लोकांना आमिष दाखवून त्यांचे सर्रास धर्मांतर घडवून आणतात.
या गटांची कार्यपद्धतीही ठरलेली असते. एखाद्या कुटुंबाला मदत देऊन चमत्कार झाल्याची कथा सांगणे, देवी-देवतांची प्रतिमा बदलून ही खरी शक्ती नाही, आमचीच शक्ती आहे असे सांगणे; मंदिरे, स्थानिक देवस्थाने येथे भ्रम निर्माण करणारे, पुजारी किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क करून मंदिरात चुकीचे धार्मिक संकेत घालणे, गरीब वंचितांना आरोग्यसेवा व अन्नाच्या बदल्यात धार्मिक मार्गदर्शन देणे; हे सर्व प्रकार संपूर्ण ख्रिस्ती समाज करत नाही, हे स्पष्ट आहे; परंतु काही विशिष्ट गट या पद्धतीने काम करतात आणि हे नाकारता येत नाही की, त्यांचा प्रभाव सर्वाधिक हिंदूंच्या गरीब व दुर्बल वर्गावर पडतो. इतर धर्मीय समाजांत संघटना, शिस्त, एकसंध रचना आणि कठोर धार्मिक बंधने असल्याने, असे प्रकार तिथे घडणे कठीण आहे. चेंबूर कालीमाता मंदिरातील घटना हा एक इशारा आहे. धर्मनिष्ठ, सद्भावनायुक्त; पण जागरूक समाजच अशा कारवायांना रोखू शकतो, हेच खरे!
अनूप कुमार रज्जन पाल
(लेखक मुंबई उच्च न्यायालयात अधिवक्ता असून, ‘एकलव्य सामाजिक प्रतिष्ठान’चे संस्थापक सदस्य आणि सचिव आहेत.)