मुंबई : (Ashish Shelar) " साहित्य संमेलनांमध्ये आलेली वैचारिक अस्पृश्यता ही धोक्याची घंटा आहे. आपण यातून प्रगल्भ होत आहोत की आपल्या समाजाचे विघटन होत आहे, याचा विचार आपण करायला हवा.साहित्य संमेलनांमध्ये नेहमी सावरकरांवरच का टीका केली जाते ? " असा सवाल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केला. मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " साहित्य संमेलन जास्तीत जास्त सर्वसमावेशक कशी होती या दृष्टीने आता विचार करणे आवश्यक आहे. साहित्य हे परिवर्तनाचे साधन आहे. आपल्याकडे आज भाषेमुळे लोकांचा मृत्यू होत असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. आपण या गोष्टींचा सर्वांकष विचार करायला हवा."
हेही वाचा : १२० बहादूर : १९६२च्या युद्धातील जवानांची शौर्यगाथा
दि. २१ नोव्हेंबर रोजी, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या अनुदानातून ग्रंथाली आयोजित मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पाडले. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये या दोन दिवसीय साहित्य सोहळ्याची सुरुवात झाली. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar), मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अभीराम भडकमकर, प्रख्यात लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, सिसिलिया कार्व्हालो, प्रख्यात लेखक राजीव श्रीखंडे,ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ग्रंथालीच्या सुदेश हिंगलासपूरकर यांनी ग्रंथाली प्रकाशाच्या प्रदीर्घ प्रवासावर तसेच भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला. मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी यावेळी मराठीचे अभिजातपणाचे पैलू लोकांपर्यंत कसे पोहोचायला हवे, तसेच येणाऱ्या काळात अर्थार्जनासाठी मराठी भाषेचा विचार कशा पद्धतीने करता येईल यावर उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रख्यात लेखक राजीव श्रीखंडे यांच्या ' ग्लोबल साहित्य सफर भाग एक ' या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. (Ashish Shelar)
हे वाचलात का ? : आधुनिक द्रोणाचार्य
राजकारणाच्या पलीकडे मराठीचा विचार व्हावा !
मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे प्रख्यात लेखक अभिराम भडकमकर यावेळी आपल्या अध्यक्ष भाषणात म्हणाले की " राजकारण हे माणसाच्या जीवनाचं एक अंग आहे, सर्वांग नाही, त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे मराठीचा विचार होणे आवश्यक आहे. आपल्याकडे इंग्रजी भाषा स्टेटस सिम्बॉल म्हणून मिरवली जाते. बऱ्याचदा ती योग्य आहे की नाही याचा विचारही मनात न आणता आपण आपल्या मराठी भाषेबद्दल न्यूनगंड बाळगून राहतो. आपल्या भाषेचा आपल्याला असल्यामुळे हा खरा रोग आहे. आणि या रोगावर इलाज करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. भाषेतले शब्द हे फक्त शब्द नसतात तर त्यांना संस्कृती लपलेली असते, पिढ्यान पिढ्यांचा इतिहास असतो. आपण ज्या वेळेला एखादा शब्द गमावतो त्यावेळेला त्या मागची संस्कृती सुद्धा गमावतो. आपल्याला मराठीची सद्यस्थिती बदलायची असेल तर सर्व स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. " (Ashish Shelar)