भारत-चीनचे १९६२ सालचे युद्ध आणि त्या युद्धात हुतात्मा झालेले भारतीय सैनिक हे विशेषत्वाने त्या पिढीच्या आजही स्मरणात आहे. अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देत, चिनी सैन्याला कडवी झुंज दिली होती. भारत-चीन युद्धावर गेल्या काही वर्षांत काही चित्रपट आणि सीरिजदेखील येऊन गेल्या, तर आता याच युद्धातील सैनिकांची शौर्यगाथा सांगणारा ‘१२० बहादूर’ हा नवा हिंदी चित्रपट दि. २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लडाख येथील रेझांग ला येथे झालेल्या या युद्धाचे पडसाद त्याकाळी जगभरात उमटले होते, तर या युद्धातील ते शूरवीर १२० योद्धे नक्की कोण होते? त्यावर आधारित हा चित्रपट.
चित्रपटाची सुरुवातच लडाखच्या हिमाच्छादित प्रदेशात तैनात सैनिकांच्या संवादाने होते. १९६२चा तो नोव्हेंबर महिना भारतावर संकटाची काळी छाया घेऊन आला. त्या काळात चीनने लडाखच्या भागात कुरघोड्या करायला सुरुवात केली होती. लडाखनंतर जम्मू-काश्मीर सहज आपल्या ताब्यात येईल, अशी चिनी ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा होती. भारतीय सैन्याने चीनचे हे मनसुबे हाणून पाडले असले तरी त्यासाठी अनेक सैनिकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.
भारतीय सैन्याचा हा लढा अजिबात सोपा नव्हता. कारण, ही लढाई समुद्रसपाटीपासून हजारो मीटर उंच हिमाच्छादित प्रदेशात लढली होती. ही गोष्ट हुतात्मा मेजर शैतान सिंग भाटी आणि त्याच्या १२० जवानांची. या चित्रपटात मुख्य पात्र मेजर शैतान सिंग भाटी यांची भूमिका फरहान अख्तरने निभावली आहे, जो फक्त १२० सैनिकांसह रेझांग ला पोस्टचे नेतृत्व करत असतो. त्यावेळी अंदाजे तीन हजार चिनी सैनिक भारताच्या लडाख भागातील काही भाग ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असतात. मर्यादित संसाधने आणि सैन्य, सातत्याने बदलते हवामान, कडायाची थंडी आणि समोर बलाढ्य शत्रू, या सगळ्या परिस्थितीला भारतीय सैन्याने दिलेली मात आणि एक ऐतिहासिक लढाई या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. मेजर शैतान सिंगची कल्पकता, नेतृत्व आणि पराक्रमाची शौर्यगाथा या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीयांसमोर मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले आहे, तर संवाद आणि लेखन हे सुमित अरोरा आणि राजीव जी. मेनन यांचे. एकूणच सिनेमॅटोग्राफी आणि वेशभूषा अगदी उत्तम साकारल्या आहेत. उदा. लडाखची गोठवणारी थंडी, त्यामुळे चेहर्यावर शुष्क त्वचा किंवा बोलतानाही जाणवणारी थंडी यामुळे चित्रपट, त्यातील पात्र अधिक जिवंत वाटतात आणि दृश्य स्वरुपात हा चित्रपट आणखीच भारावून टाकतो. काही दृश्ये अगदी अचूक टिपली असली तरी दिग्दर्शनाचा म्हणावा तसा प्रभाव पडत नाही. यात आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे संवाद. चित्रपटातील संवाद अधिक परिणामकारक होऊ शकले असते.
चित्रपटात मुख्य पात्र (मेजर भाटी) अभिनेता फरहान अख्तरने साकारले असून, आज पन्नाशीत असलेल्या फरहानने या पात्राला पुरेपूर न्याय दिला आहे. याशिवाय अभिनेते अजिंय देवसुद्धा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. शिवाय बरेच नवे चेहरेसुद्धा तितकेच लक्षवेधी ठरले आहेत. राशी खन्ना, विवान भटेना, एजाज खान, स्पर्श वालिया आणि अंकित सिवाच यांसारखे बरेच कलाकार चित्रपटात असून, प्रत्येकाने आपापली भूमिका उत्तम निभावली आहे.
भारत-चीन युद्धावर आधारित अशा या देशभक्तीपर चित्रपटांत खरं तर तशाच धाटणीची ऊर्जावान गाणी असती, तर या कथानकाला, त्यातील पात्रांना अधिक जिवंतपणा प्राप्त झाला असता. पार्श्वसंगीतही कथानकाच्या, पात्रांच्या तोडीचे हवे होते. पण, या चित्रपटात प्रेक्षकांकडून सातत्याने गुणगुणले जाईल किंवा १५ ऑगस्ट, २६ जानेवारीसारख्या सोहळ्यांना समर्पक ठरेल, असे एकही गाणे नसून, जी गाणी आहेत, ती अगदीच सामान्य म्हणावी लागतील.
‘एसेल एन्टरटेन्मेंट’चा चित्रपट असल्याने एकूणच निर्मितीमध्ये चित्रपट फार सुंदर असेल, अशा अपेक्षा नक्कीच होत्या. पण, याबाबतीत प्रेक्षकांचा काहीसा अपेक्षाभंग होऊ शकतो. असो. पण, एकंदरीतच चित्रपटाची कथा दिग्दर्शकाने योग्यरित्या मांडल्यामुळे, ती प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करुन जाते. पण, उत्तम गाणी आणि ठसठशीत संवाद नक्कीच सिनेमाला ब्लॉकबस्टर बनवू शकले असते. तेव्हा या वीकेंडमध्ये कुटुंबासह विशेषत्वाने लहान मुलांसोबत एखादा चित्रपट पाहण्याचे नियोजन असेल, तर हा चित्रपट एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
दिग्दर्शक : रजनीश घई
कलाकार : फरहान अख्तर, अजिंय देव, राशी खन्ना, विवान भटेना, एजाज खान, स्पर्श वालिया आणि अंकित सिवाच
लेखक : सुमित अरोरा आणि राजीव जी. मेनन
निर्मिती : एसेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओज
रेटिंग : 3 स्टार
- अपर्णा कड