Anmol Bishnoi Deportation : कुख्यात गुंड अनमोल बिश्नोईचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, NIA कडून दिल्ली विमानतळावर अटक

19 Nov 2025 16:11:39

Anmol Bishnoi Deportation

मुंबई : (Anmol Bishnoi Deportation) कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ आणि अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपी असलेला अनमोल बिश्नोई याला मंगळवारी अमेरिकेतील होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटने हद्दपार केल्यानंतर बुधवारी दि. १९ नोव्हेंबर रोजी त्याला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले आहे. यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) पथकाकडून त्याला विमानतळावरच ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर ४ वाजता त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा - Delhi Red Fort blast : उमर नबीचे आणखी काही व्हिडिओ तपासयंत्रणांच्या हाती; धाकट्या भावाच्या चौकशीतून मोबाईल जप्त

अनमोल बिश्नोई याच्यावर बाबा सिद्दिकी हत्याकांड, सिद्धू मुसेवाला हत्याकांड आणि अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार अशा अनेक हायप्रोफाईल गुन्ह्यांचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोई हा २०२२ मध्ये बनावट पासपोर्टच्या मदतीने भारतातून फरार झाला होता. त्यानंतर नेपाळ, दुबई, केनिया असा फिरत फिरत तो अमेरिकेत पोहोचला होता. तिथून तो कॅनडामध्ये येजा करत होता. दरम्यान, गेल्या वर्षी अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने त्याला कॅलिफोर्नियामधून ताब्यात घेतले. तेव्हापासून तो स्थानिक पोलिसांच्या कैदेत होता.
एनआयएने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, "२०२२ पासून फरार असलेल्या आणि अमेरिकेत राहणाऱ्या अनमोल बिश्नोईला अटक करण्यात आली आहे. तो तुरुंगात असलेला त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोई याच्या दहशतवादी सिंडिकेटमध्ये सहभागी आहे आणि आतापर्यंत या सिंडिकेटच्या १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एनआयएने म्हटले आहे की, "एका प्रकरणाच्या तपासादरम्यान, असे उघड झाले की, त्याने २०२०-२०२३ दरम्यान देशातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई या दहशतवादी संघटनेला मदत केली होती. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, एनआयएने मार्च २०२३ मध्ये अनमोलविरुद्ध आरोपपत्र दाखल केले."
दरम्यान, मंगळवारी अमेरिकेतील होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटने २०० जणांना भारतात हद्दपार केले आहे. त्यामध्ये अनमोल बिश्नोई याचाही समावेश आहे. भारतात पाठवण्यात आलेल्यांमध्ये १९७ बेकायदेशीर वास्तव्य करणारे नागरिक तर दोन कुख्यात गुन्हेगारांचा समावेश होता.
Powered By Sangraha 9.0