Delhi Red Fort blast : उमर नबीचे आणखी काही व्हिडिओ तपासयंत्रणांच्या हाती; धाकट्या भावाच्या चौकशीतून मोबाईल जप्त

    19-Nov-2025   
Total Views |

Delhi Red Fort blast

मुंबई : (Delhi Red Fort blast) दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबरला आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आरोपी उमर नबीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आत्मघाती बॉम्बस्फोटाचे वर्णन "शहीद मोहीम" असे करत असल्याचे ऐकायला मिळत आहे. या प्रकरणी जैश-ए-मोहम्मद दहशतवादी मॉड्यूलच्या तपासादरम्यान त्याच्या या व्हिडिओसंदर्भात महत्त्वाचे खुलासे झाले आहेत.

माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, उमर नबीने हा व्हिडिओ त्याच्या स्वतःच्या मोबाइल फोनवरून रेकॉर्ड केला होता. उमरने हा फोन त्याच्या धाकट्या भावाकडे दिला होता, ज्याला बॉम्बस्फोटाच्या रात्री जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी त्याच्या पुलवामा येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले होते. त्याचा मोठा भाऊदेखील पोलीस कोठडीत आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरच्या सांगण्यावरून त्याच्या धाकट्या भावाने हा फोन एका गटारात फेकून दिला होता. चौकशीदरम्यान, त्याने कबूल केले की त्याच्या भावाने त्याला फोन दिला होता. यानंतर त्याने पोलिस पथकाला त्या गटाराजवळ नेले, जिथे त्याने उमरचा फोन फेकला होता. खूप प्रयत्नांनंतर, तो फोन सापडला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन जप्त केल्यानंतर, पोलिसांनी तो डेटा रिकव्हर करण्यासाठी पाठवला होता. यातून किमान चार व्हिडिओ रिकव्हर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ एनआयए आणि राज्य तपास संस्थेला देण्यात आले आहेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उमरच्या सहका-यांनी चौकशीदरम्यान उघड केले आहे की, तो सर्व जैश मॉड्यूलमध्ये सर्वात कट्टरपंथी होता आणि अनेकदा आत्मघाती बॉम्बस्फोटांबद्दल बोलायचा.

जप्त केलेल्या दोन मोबाईल फोनमधील कॉल डेटा रेकॉर्डच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणात सह-सूत्रधार किंवा उमरशी जवळचे संबंध असलेल्या संशयितांची यादी तयार केली आहे. तसेच, अल फलाह विद्यापीठातील डॉक्टर आणि जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांसह ६० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\