मुंबई : (Deepak Kesarkar) मुंबईतील पवई भागात गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी ओलीस ठेवलेल्या १७ मुलांची पोलिसांकडून सुखरुप सुटका करण्यात आली. मात्र पोलिसांच्या चकमकीत या प्रकरणातील आरोपी रोहित आर्य याचा मृत्यू झाला. वेब स्टोरीचे ऑडिशन असल्याचे सांगून त्याने या मुलांना आरए स्टुडिओमध्ये बोलवले होते. त्यानंतर सर्व मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते.
दरम्यान, माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्य याने महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याशी, त्यांच्या विभागाशी संबंधित काही समस्यांवर बोलायचे आहे, असे म्हटले होते. त्याचबरोबर त्याने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांनी त्याचे न ऐकल्यास स्टुडिओला आग लावण्याची, स्वतःला आणि मुलांना इजा करण्याची धमकी देखील दिली होती.
दीपक केसरकर (Deepak Kesarkar) नेमकं काय म्हणाले ?
या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, "रोहित आर्य यांना आम्ही 'माझी शाळा सुंदर शाळा' या उपक्रमात काम दिले होते. मात्र त्याने लोकांकडून परस्पर पैसे घेतले असल्याची गंभीर तक्रार विभागाकडून करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या त्यांनी विभागाशी बोलून सोडवायला हव्या होत्या. शेवटी सरकारची काम करण्याची एक पद्धत असते, त्यांनी देखील तसंच काम करायला हवं होतं. असं लहान मुलांना ओलीस ठेवणं हे चुकीचे आहे."