मुंबई : (Rohit Arya) मुंबईतील पवई भागात गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी ओलीस ठेवलेल्या १७ मुलांची पोलिसांकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. एका अज्ञाताकडून एआर स्टुडिओमध्ये दिवसाढवळ्या मुलांना बंदी बनवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता मोठ्या प्रमाणात पोलीस कारवाई करत सर्व मुलांची सुटका करण्यात आली आहे. मात्र पोलिसांच्या चकमकीत रोहित आर्य (Rohit Arya) हा आरोपी जखमी झाला होता आणि आता त्याचा मृत्यू झाला आहे.
माध्यमांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, वेब स्टोरीचे ऑडिशन असल्याचे सांगून या मुलांना एआर स्टुडिओमध्ये बोलवण्यात आले होते. त्यानंतर या मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते.
पवई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन सोनवणे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, स्टुडिओमधून विद्यार्थ्यांना सोडवल्यानंतर 'रोहित आर्य' (Rohit Arya) नामक एका मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. ज्याच्या हातात शस्त्र देखील होते. त्यांचबरोबर, ताब्यात घेतलेल्या या व्यक्तीला महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी त्यांच्या विभागाशी संबंधित काही समस्यांवर बोलायचे आहे, असेही सोनवणे यांनी सांगितले.
मुंबई अग्निशमन दलाचे स्टेशन ऑफिसर अभिजित सोनवणे यांनी माध्यमांना सांगितले की, “दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आमच्या विभागाला पोलिसांकडून फोन आला. आम्ही आमच्या हायड्रॉलिक साधनांनी ग्रिल्स कापल्या आणि पोलिसांना प्रवेश दिला. ते आत शिरले आणि आता सर्व मुलांना वाचवण्यात यश आले आहे.” दरम्यान, पोलीस अधिकार्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सर्व मुलांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले असून, त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, योग्य पडताळणीनंतर अधिक माहिती दिली जाईल.
पोलीस अधिकारी पुढे म्हणाले की, संशयित व्यक्ती आर्य याने तब्बल तीन तास मुलांना डांबून ठेवले होते. त्यानंतर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये तो काही लोकांशी बोलू इच्छित असल्याचा दावा करत होता आणि त्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 'स्टुडिओला आग लावण्याची, स्वतःला आणि मुलांना इजा करण्याची धमकी देत होता.