बेस्ट स्मार्ट मीटरिंग टीमतर्फे धारावीतील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती उपक्रम

30 Oct 2025 15:34:03

Smart meter
 
मुंबई : ( Smart meter ) वीज वापरात सजगता आणि स्मार्ट मीटरिंगविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने बेस्ट स्मार्ट मीटरिंग समूहाच्या माध्यमातून धारावी येथील बी.एस.आय.ए.एस. इंग्लिश हायस्कूलमध्ये एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागात्मक आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे स्मार्ट मीटरची माहिती देण्यात आली. या उपक्रमात पथनाट्य सादर करून स्मार्ट मीटरचे फायदे अत्यंत सृजनशील आणि मनोरंजक पद्धतीने मांडले गेले. त्यानंतर घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी माहितीपर पत्रके तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले.
 
“मला आधी माहीतच नव्हते की स्मार्ट मीटरमुळे वीज आणि पैशांची बचत होते. या पथनाट्यामुळे बरीच माहिती मिळाली ,” असे इयत्ता नववीतील आरवने सांगितले. तर “ आजच्या उपक्रमात खूप मजा आली आणि शिकायलाही मिळाले. आज घरी जाऊन मी माझ्या आई वडिलांना स्मार्ट मीटरबद्दल सांगणार आहे,” असे इयत्ता आठवीतील मेहरने उत्साहाने सांगितले.
 
हा उपक्रम बेस्टच्या समुदाय सहभाग आणि ऊर्जा साक्षरता वाढविण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग असून, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना स्मार्ट मीटरविषयी जागरूक करून त्यांचा वीज वापर अधिक कार्यक्षम बनविणे हा त्यामागील उद्देश होता. या प्रसंगी किरण कोळी ( उपभियंता बेस्ट), शाळेच्या मुख्याध्यापिका मेरी अरुणाचलम तसेच जीएन विभागातील अधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या प्रयत्नातून धारावी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये स्मार्ट मीटरिंगविषयी अधिक रुची निर्माण होईल आणि त्याचा वापर वाढेल, असा विश्वास बेस्ट कडून व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
स्मार्ट मीटरचे फायदे
- स्मार्ट मीटर ही एक अत्याधुनिक सुविधा असून ती ग्राहक आणि वीज वितरण कंपन्यांसाठी वीज व्यवस्थापन अधिक प्रभावी बनवते. स्मार्ट मीटरद्वारे वीज वापराची चालू माहिती मिळत असल्याने घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना स्वतःचा वापर समजून घेऊन वाया जाणारी वीज कमी करता येते आणि वीज देयकात बचत करता येते.
- स्मार्ट मीटरद्वारे वीज खंडित होण्याची किंवा तांत्रिक बिघाडाची माहिती तत्काळ मिळते, ज्यामुळे दुरुस्तीचे काम वेगाने करता येते आणि नागरिकांना अखंडित सेवा मिळते.
 
- स्मार्ट मीटरमुळे देयक प्रक्रिया अधिक अचूक होते, वितरण व्यवस्थापन सुधारते आणि सेवा विश्वसनीयता वाढते. तसेच, डायनॅमिक प्राइसिंग मॉडेल्सला ( परिवर्तित किंमत प्रणाली ) समर्थन मिळते, ज्याद्वारे ग्राहकांना कमी दरात वीज मिळू शकते. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये या पद्धतीचा लाभ स्मार्ट मीटरधारक ग्राहकांना दिला जात आहे.
- याशिवाय, स्मार्ट मीटरमुळे वीज वितरणातील तांत्रिक व व्यावसायिक तोटे कमी होतात, जे काही राज्यांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. हे तोटे कमी होऊन वितरण कंपन्यांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात घटते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0