MPCB : मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हवा प्रदूषणबाबत 'MPCB'चे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी घेतली आढावा बैठक

29 Oct 2025 20:24:56

 MPCB

मुंबई : (MPCB) मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा प्रदूषण नियंत्रणाबाबत मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अध्यक्ष सिध्देश कदम यांनी महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या समवेत नुकतीच एक आढावा बैठक घेतली. वर्तमानात हवामानात होणारे बदल आणि थंडीची होणारी सुरवात या पार्श्वभूमीवर भविष्यात हवा प्रदूषणाचा प्रश्न कशा पध्दतीने हाताळता येईल याबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अध्यक्ष सिध्देश कदम यांनी मुंबई शहरातील सुरू असलेली बांधकामे, बेकरी, आर. एम. सी. प्लॅन्ट, इमारतीच्या पुर्नविकासामुळे निर्माण होणारे डेब्रिज यामुळे हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होऊ नये याकरीता महानगरपालिकेने योग्य त्या उपाययोजना केल्यास आपल्याला गंभीर प्रश्नाला सामोरे जावे लागणार नाही असे प्रतिपादन यावेळी व्यक्त केले.

 हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : लोकशाहीमध्ये प्रक्षोभक भाषा योग्य नाही  

मुंबई शहरातील अनेक गृहप्रकल्पांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यातून निर्माण होणारा धुळीचा प्रश्न याबाबत महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर बेकरी व स्मशाने ही लाकडावर अवलंबून न राहता ती नैसर्गिक वायू अथवा विजेवर परावर्तित करणे याकरीता निश्चित कालमर्यादा आखून घेणे गरजेचे असल्याचे मत कदम यांनी व्यक्त केले. शहरातील हवा प्रदूषणाचा प्रश्न सुयोग्य पध्दतीने हाताळता यावा याकरीता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) व मुंबई महानगरपालिका यांनी

संयुक्तरीत्या योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत महानगरपालिकेने सकारात्मकता दर्शविली आहे. या बैठकीला महानगापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, उपायुक्त दिघावकर व महानगरपालिकेचे व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

 
Powered By Sangraha 9.0