मुंबई : (Gangaram Gavankar) प्रसिद्ध नाटककार आणि 'वस्त्रहरण' या विक्रमी नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर (Gangaram Gavankar) यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे सध्या मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. सोमवार दि. २७ ऑक्टोबर रोजी दहिसरमधील एका खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या दिग्गज कलावंताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
_202510281445447891_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, "मालवणी बोलीचा गोडवा आणि ठसका जगभर पोहोचविणारा, कोकणातील बहुमुखी प्रतिभावंत अशा साहित्यिक, नाटककाराला आपण मुकलो आहोत. 'वस्त्रहरण' या विक्रमी नाटकासह, इतर नाट्यकृतींच्या माध्यमातून मराठी रंगभूमीसाठीचे स्वर्गीय गवाणकर यांचे योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल. दरम्यान, अभिजात मराठीचे सौंदर्य आणि सौष्ठव मालवणी बोली आणखी ठसठशीतपणे मांडते. अशा या मालवणीची नादमाधुर्यता आणि तिचा ठसका स्वर्गीय गवाणकर यांनी आपल्या नाट्यकृतींतून जगभर पोहोचविला. त्यांच्या इतर नाट्यकृती देखील वेगळ्या धाटणीच्या आणि आशयघन राहिल्या आहेत. पौराणिक ढाच्यातील 'वस्त्रहरण' वर्तमानातील चपखल संदर्भ घेत आजही महाविक्रमी वाटचाल करीत आहे, ही त्यांच्या लेखनाची ताकद राहिली. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी, कला-साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे."
हेही वाचा : दिल्लीत पहिल्यांदाच पडणार कृत्रिम पाऊस! क्लाउड सीडिंग चाचणीसाठी तयारी पूर्ण
"गवाणकर कुटुंबीय, मराठी रंगभूमी चळवळ, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असून, त्यांना हा आघात सहन करण्याची क्षमता मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार गंगाराम गवाणकर (Gangaram Gavankar) यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
हे वाचलात का ? : लोहपुरुषाची १५०वी जयंती : एकतानगरात भव्य कार्यक्रम!
गंगाराम गवाणकर (Gangaram Gavankar) यांचा रंगभूमीवरील अविस्मरणीय प्रवास...
१९७१ साली गंगाराम गवाणकर (Gangaram Gavankar) यांनी त्यांच्या रंगभूमीतील कारकिर्दीला सुरूवात केली. कोकण सुपुत्र असलेल्या स्वर्गीय गवाणकर यांनी मराठी रंगभूमीला 'वस्त्रहरण', 'दोघी', 'वनरूम किचन', 'वर भेटू नका', अशी अनेक लोकप्रिय नाटकं दिली. त्यांच्या लेखनातील विनोद, वास्तव आणि संवादशैली याने अनेक प्रेक्षकांचे मन जिंकून घेतलं. शिवाय त्यांनी ९६व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. एक कलाकार म्हणून ही त्यांच्यासाठी अतिशय गौरवाची बाब होती.