दिल्लीत पहिल्यांदाच पडणार कृत्रिम पाऊस! क्लाउड सीडिंग चाचणीसाठी तयारी पूर्ण

    28-Oct-2025   
Total Views |
 
Delhi
 
 
नवी दिल्ली : (Delhi's First Cloud Seeding Trial) दिल्लीमध्ये हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच क्लाउड सीडिंग (Cloud Seeding) द्वारे कृत्रिम पावसाची चाचणी मंगळवारी दि. २८ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरच्या तांत्रिक साहाय्याने हा प्रयोग करण्याची दिल्ली सरकारची योजना आहे. कानपूरमध्ये हवामान अनुकूल असल्यास मंगळवारी दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी क्लाउड सीडिंगचा प्रयोग होण्याची शक्यता आहे, असे दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले.
 
पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले, "क्लाउड सीडिंगची पहिली चाचणी ही कानपूरमधील हवामान परिस्थितीवर अवलंबून आहे. क्लाउड सीडिंग (Cloud Seeding) साठी वापरले जाणारे विमान कानपूरमध्ये आहे. सध्या तिथे दृश्यमानता (visibility) २००० मीटर आहे आणि ती ५००० मीटरपर्यंत पोहोचल्याशिवाय विमान उड्डाण करू शकत नाही. हवामान अनुकूल झाल्यास, विमान कानपूरहून उड्डाण करेल, दिल्लीमध्ये क्लाउड सीडिंग करेल आणि परत जाईल. हे संपूर्ण ऑपरेशन दुपारी १२.३० ते १ वाजताच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे." थोडक्यात, जर कानपूरमध्ये दृश्यमानता योग्य पातळीवर गेली, तर आज दिल्लीमध्ये पहिली क्लाउड सीडिंग (Cloud Seeding) प्रक्रिया होऊ शकते.
 
‘क्लाऊड सीडिंग’ म्हणजे काय?
 
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 'क्लाउड सीडिंग' (Cloud Seeding) नावाचे तंत्रज्ञान वापरले जाते. यात ढगांमध्ये विशिष्ट रसायने मिसळून पाऊस पाडला जातो, ज्यामुळे हवेतील धूळ आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होते. सोप्या शब्दात सांगायचे तर ढगांमध्ये पावसाचे बीज पेरण्याच्या प्रक्रियेला ‘क्लाऊड सीडिंग’ (Cloud Seeding) म्हणतात. यामध्ये, सिल्व्हर आयोडाइड, पोटॅशियम क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड यांसारखे रासायनिक पदार्थ विमानांच्या मदतीने ढगांमध्ये फवारले जातात. फवारलेले हे पदार्थ ढगांमध्ये पसरतात आणि ढगांतील पाण्याचे थेंब गोठवतात. ढगातील बाष्प शोषून थेंबाचा आकार वाढून ढगांतून पाऊस पडायला सुरुवात होते. अशाप्रकारे कृत्रिम पाऊस पाडता येतो.
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\