जपानच्या संसदेने मंगळवार दि.२१ ऑक्टोबर रोजी अतिशय पारंपरिक विचारांच्या असलेल्या साने ताकाईची यांची, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी निवड केली. यापूर्वी जपानमध्ये सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष अर्थात एलडीपीने साने ताकाईची यांची, पक्षनेनेपदीही निवड केली होती. साने ताकाईची यांची निवड हा जपानसाठी एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. साने ताकाईची या केवळ एलडीपीच्या पहिल्या महिला नेत्याच नाहीत, तर दुसर्या महायुद्धानंतरच्या काळात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही राजकारणात उच्च स्थान मिळवणार्या, मोजया नेत्यांपैकीच त्या एक आहेत.
परराष्ट्र धोरणाबाबतीत साने ताकाईची या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या ‘मुक्त आणि खुले हिंद-प्रशांत क्षेत्र’ या दृष्टिकोनाच्या समर्थक आहेत. त्या अमेरिका आणि चतुष्कोणी सुरक्षा संवाद (क्वाड) यांच्याशी घनिष्ठ सहकार्याच्या पुरस्कर्त्या आहेत. ‘क्वाड’ ही ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांच्यातील एक राजनैतिक भागीदारी आहे, ही भागीदारी स्थिर, शांततापूर्ण, समृद्ध, समावेशक हिंद-प्रशांत क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी कायम कटिबद्ध आहे. साने ताकाईची या प्रादेशिक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी, प्रादेशिक भागीदारांमधील मजबूत संबंधांचीही वकिली करतात.
चीन आणि उत्तर कोरियाविरुद्ध त्यांचा आक्रमक दृष्टिकोन, हा त्याच धोरणाचा भाग. ताकाईची यांच्यासमोर असणार्या प्रमुख आव्हानांमध्ये जपानची घटती लोकसंख्या थांबवणे आणि जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत नवचैतन्य आणणे, यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश होतो. संसदेत दोन्ही सभागृहांमध्ये अल्पमत असल्याने, नवीन आघाडीला कायदे मंजूर करण्यासाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज नक्कीच भासेल. ताकाईची यापूर्वी आक्रमक आर्थिक धोरणे आणि शासकीय खर्चात वाढीच्या बाजूने होत्या, ज्यांचा दृष्टिकोन त्यांचे गुरू माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या ‘आबेनॉमिस’ धोरणाशी मिळताजुळताच आहे.
साने ताकाईची आपल्या मंत्रिमंडळात सात्सुकी कतायामा यांना अर्थमंत्री म्हणून नियुक्त करण्याची शक्यता आहे. हा जपानच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग असेल, जेव्हा एखादी महिलाच अर्थमंत्रीही होईल. ताकाईची आणि कतायामा दोघीही माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. कतायामा सध्या एलडीपीच्या वित्त आणि बँकिंग प्रणाली संशोधन आयोगाच्या अध्यक्षा आहेत आणि त्यांना अर्थव्यवस्थेची उत्तम जाण असलेल्या नेत्या म्हणूनच त्यांना ओळखले जाते.
ताकाईची महिला सशक्तीकरणाच्या समर्थक आहेतच; परंतु काही बाबतीत त्या कट्टर परंपरावादीही आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, जपानच्या शाही कुटुंबाचा वारसदार पुरुषच असावा आणि त्या समलैंगिक विवाहाच्या कट्टर विरोधक आहेत. त्या लग्नानंतर ‘फूफू बेसेई’ किंवा विवाहित जोडप्यांसाठी स्वतंत्र आडनाव ठेवण्याच्या कल्पनेलाही विरोध करतात. त्यांच्यामध्ये ही संकल्पना जपानी परंपरेच्या विरुद्ध आहे. त्या जपानी मूल्यांच्या संरक्षणावर भर देतात.
ताकाईची जपानच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला प्राधान्य देतात. त्यामुळे दहशतवादी हल्ल्यांबाबत कठोर भूमिका घेणे, हल्ल्यांना रोखण्यासाठी कायदे, सुरक्षा यंत्रणा व कूटनीतिक उपाय प्रभावी ठेवणे हा त्यांच्या धोरणाचा भाग आहे. ताकाईची यांचा विश्वास आहे की, दहशतवाद फक्त एका देशाची समस्या नाही, तर प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यावर परिणाम करणारी बाब आहे. म्हणून जागतिक भागीदारांसह समन्वय करून, दहशतवाद प्रतिबंधित करणे आवश्यक असल्याचे त्या मानतात.जपानमध्ये दहशतवादी हल्ल्यांवर कठोर कायदे आहेत आणि ताकाईची या नियमांचे पालन आणि आवश्यक तेव्हा सुधारणा करण्याच्या समर्थक आहेत.
थोडक्यात, ताकाईची यांचा दृष्टिकोन दहशतवादाविरुद्ध कट्टर, सावध आणि जागतिक सहकार्यावर आधारित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा ताकाईची यांना शुभेच्छा देत, भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. भारत-जपानमधील वाढते संबंध हिंद-प्रशांत प्रदेशात आणि त्यापलीकडे शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचीही भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. या सर्व गोष्टी पाहता, साने ताकाईची यांचा विजय हा जपानच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवातच म्हणावी लागेल.