भारतीय अर्थविचारातील शाश्वत तत्त्वे

Total Views |
indian economy
 
काळ प्रवाही आहे. एका काळातील सर्वच विचार नव्या काळात आहेत तसेच लागू पडत नाहीत. असे असले तरीही ते विचार नव्या काळात सर्वार्थाने त्याज्य मानण्याची गरज नाही. त्या विचारांमधील अनेक तत्त्वे ही काळाच्या कसोटीवर टिकणारी असतात. हिंदू धर्माच्या अर्थविचारातील अनेक तत्त्वे आजच्या काळात देखील मार्गदर्शक आहेत. अशा तत्त्वांचा घेतलेला आढावा...
उपयुक्ततावादाच्या नैतिक पायावर आणि तर्कप्रधानतेच्या गणिती आधारावर उभ्या असलेल्या युरोपीय जडवादी अर्थचिंतनातील गुणदोष पाहिल्यानंतर, भिन्न प्रकारचे आर्थिक सिद्धांतन उभे करण्यासाठी अर्थायामाच्या मूळ नीतीतत्त्वांची चर्चा आवश्यक आहे. परंतु, केवळ कौटिल्यादी प्राचीन ग्रंथांकडे पाहिल्यास, आजच्या युगास अनुकूल अशा प्रकारचे चिंतन त्यातून निर्माण करणे हे अवघड कार्य आहे. आजच्या काळातील अर्थकारणाची दिशा आणि त्याविषयीचे आकलन प्राचीन काळापेक्षा कित्येकपट व्यामिश्र झाले असून, विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर बदललेले पुरवठ्याचे अर्थशास्त्र आणि अर्धधातुके आणि संगणक क्षेत्रातील क्रांतीनंतर बदललेले सेवा क्षेत्रांचे महत्त्व या सर्वांचा विचार प्राचीन भारतीय चिंतनातून थेट सापडणे शयच नाही.
 
त्यामुळे भारतीय चिंतनातील शाश्वत तत्त्वे कोणती आणि त्यांची युगानुकूल मांडणी कशाप्रकारे करावी, याचा विचार अपरिहार्य आहे. निर्वसाहतीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहत प्राचीन भारतीय चिंतनाचे नवीन आकलन करताना, आपण पाश्चात्य चौकटीतूनच विचार करत नाही ना, याचेही भान सदैव ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा पाश्चात्य विमर्शासच अनुकूल मते कशी प्राचीन भारतीय ग्रंथांत सापडतात या प्रकारचे चिंतन निर्माण होऊन, त्यातून कुठलेही नवीन विचारप्रवाह निर्माण न होणे या गर्तेत आपण अडकू शकतो. या दोन्ही अडचणींचे भान ठेवत, भारतीय अर्थचिंतनातील काही शाश्वत तत्त्वांचा विचार आज आपण करू.
 
कुठल्याही तत्त्वविचाराविषयी मांडणी करताना त्या एकाच विषयाची मांडणी करणे, असा एकशाखीय विचार मुळात हिंदू प्रकृतीशी विसंगत आहे. त्याच आधारे अर्थविचारातील चिंतन असा स्वतंत्र विचार भारतीय चिंतनावकाशात न घडता, आपण त्याला पुरुषार्थ चतुष्टयाच्या चिंतनात स्थान देतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे भारतीय चिंतनातील पुरुषार्थ चतुष्टय सर्वश्रुत आहेत. मानवी जीवनात या चारही पुरुषार्थांचे पालन करावयाचे असल्याचा आदर्श हिंदू संस्कृती मानते. आजच्या अर्थशास्त्राच्या विचारात यातील अर्थ आणि काम पुरुषार्थांचे सुयोग्य संवहन करण्याविषयीचे चिंतन अंतर्भूत होते आणि त्यालाच ढोबळमानाने आजच्या परिभाषेत, अनुक्रमे पुरवठ्याच्या बाजूचे आणि मागणीच्या बाजूचे अर्थशास्त्र असे म्हटले जाते.
 
धर्माचे चिंतन आजच्या अर्थशास्त्रात नीतितत्त्वांच्या पायातून होते. नीतीच्या आधारे काम आणि कामाच्या पूर्तीसाठी अर्थ, ही भारतीय चिंतनातीलच क्रमवारी आजही पाळली जाते. पण, प्रत्येक टप्प्यावरील नीतिनियमांच्या आणि पुरुषार्थाच्या प्राप्तीविषयीच्या कल्पना वेगळ्या आहेत. मोक्षाचा विचार तर संपूर्ण भारतीय विचार आहेच; पण त्याला समांतर असा जगदंताचा सिद्धांत (शीलहरीेंश्रेसू) युरोपीय विचारप्रणालीत सांगितला गेला आहे. या सर्व समांतर संकल्पना आणि त्यांच्यातील भेदांचे आकलन, भारतीय अर्थचिंतनविषयक नवीन विचार मांडण्यास आवश्यक आहे.
 
‘मागणी तसा पुरवठा’ या आधुनिक म्हणीतसुद्धा सांगितल्याप्रमाणे अर्थचिंतनात मागणीच्या बाजूचे अर्थशास्त्र म्हणजेच, हिंदू मांडणीनुसार कामविचार हा महत्त्वाचा आणि प्राथमिकतेने चिंतनाच्या स्पष्टीकरणाचा विषय आहे. काम किंवा कामना म्हणजे, मनुष्यांना असणार्‍या विविध भोगांविषयीच्या इच्छा. आहार, निद्रा, भय आणि मैथुन, या पशु आणि मानव यांच्यातील समान कामना असल्याचे सांगितले जाते. परंतु, मानवी कामेच्छा या साध्या शरीर भोगांशी संपत नाहीत. मानवांना सतत अधिकच्या भोगांची तृष्णा असते. ही तृष्णा जीवाच्या मायेशी असणार्‍या बंधाचे कारण आहे, ती सर्व दुःखाचे मूळ आहे अशा प्रकारचे चिंतन, सर्वच भारतीय दर्शनांतून सांगितलेले आहे. त्यागपूर्वक भोगाचे उपनिषदांचे कथन सुप्रसिद्ध आहेच पण, त्याचबरोबर हीच भोगतृष्णा प्रगतीचे मूळ असल्याचेही आपल्याला दिसते.
 
साधेपणाच्या प्राचीन जीवनातून पुढे येऊन मानवी समाजाची जी प्रचंड प्रगती झालेली आपण पाहतो, अनुभवतो आणि रोजच्या जीवनात भोगतो त्या सर्व चक्राची सुरुवात न भागणार्‍या सुखाच्या तृष्णेनेच होते. या विरोधाभासाची संगती लावायची असेल तर हे तर लक्षात घ्यायला हवे की, आपल्या संस्कृतीत काम पुरुषार्थाचे नियमन दमनपूर्वक नाही, तर धर्मपूर्वक करायला सांगितले आहे. कामाचे संपूर्ण दमन करणे हा संन्याशांचा आदर्श असू शकतो; पण सर्व आश्रमांतील श्रेष्ठ सांगितल्या गेलेल्या गृहस्थाश्रमात, धर्मपूर्वक काम पुरुषार्थाचे पालन करणे अपेक्षित आहे. भारतीय चिंतन हे प्रगतीच्या अवरुद्ध नाही, तर धर्मसंमत प्रगतीचा पुरस्कार करणारे आहे. धर्मपूर्वक कामसिद्धीसाठी आपल्याकडे ‘दोहन संकल्पना’ सांगितली जाते. ज्याप्रकारे गायीला कोणताही त्रास होऊ न देता, तिच्या पोषणाचा योग्य विचार करूनच तिचे दोहन केले जाते आणि दूध प्राप्त केले जाते. त्याचप्रकारे सर्व नैसर्गिक संसाधने, मानवी भांडवल आणि धरतीच्या पोटातील खनिज द्रव्ये याचे अमर्याद शोषण न करता, दोहन विचाराने भोग घेतल्यास धर्माच्या आधारे काम साधतो असे म्हणता येईल.
 
संसाधनांचे शोषण होऊ न देता उपभोग घ्यावयाचा असेल, तर स्वाभाविकपणे उत्पादन प्रक्रियेवर काही विशिष्ट बंधने निर्माण होतात. मागणीच्या बाजूचे अर्थशास्त्र नियंत्रित केल्यावर, पुरवठ्याच्या बाजूला जे स्वाभाविक नियंत्रण निर्माण होईल ते इथे अभिप्रेत नाही. पुन्हा तर्कप्राधान्याचा आधार घेऊन गणिती पद्धतीने आणि राजदंडाच्या साहाय्याने (विविध कर आणि शुल्के बसवून) जर पुरवठ्याच्या अर्थशास्त्राचे नियमन केले, तर स्वाभाविक मानवी सृजनशीलतेला मर्यादा येतात. अशाप्रकारच्या नियमनातून, अर्थचक्राला संशोधनात्मक कार्यातून मिळणारी प्रगती खुंटते. अर्थ पुरुषार्थाचे नियमन, धर्माच्या आधारे करण्याचे नेमके आकलन या दुविधेतून मुक्त होण्यास आवश्यक आहे. व्यक्तिगत अर्थसाधना आणि सामाजिक अर्थसाधना यांच्या मेळाचा विचार केल्यास, त्यातील धर्मविचार स्पष्ट होऊ शकतो.
 
कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हे त्या व्यक्तीची अंगभूत कौशल्ये, बुद्धीचा आवाका आणि मानसिक जाणिवेची खोली या तिन्हीमधून तर बनतेच; पण त्याहीपलीकडे आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या मुळाशी आत्मतत्त्वाचा गाभा असतो, असे हिंदू जीवनदृष्टी मानते. अर्थाच्या पूर्तीसाठी शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही पातळ्यांवरचा पुरुषार्थ साधला जायला हवा. जीवनाच्या व्यवहारात आपण केवळ एकांगी दृष्टी आचरून, तिन्हीमधील ज्या आयामाच्या आचरणाने अधिकाधिक अर्थप्राप्ती होईल केवळ त्याच आयामातून पुरुषार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या पुरुषार्थ सिद्धीतून संपूर्ण वैयक्तिक समाधान मिळत नाही, हा कित्येकांचा अनुभव आहे. परंतु, याच एकांगी उत्कर्ष साधण्याच्या प्रयत्नातून ज्या सामाजिक व्यवस्थेचा पुरस्कार केला जातो, त्यात सर्वांगीण अर्थ साधण्याच्या वृत्तीस गौण स्थान मिळून, समाजाच्याच अर्थ पुरुषार्थाचा लोप होण्याची स्थिती निर्माण होते.
 
धर्मानुकूल अर्थाचरण न होण्याच्या दोन अवस्थांचे वर्णन, दीनदयाळ हे अर्थाचा प्रभाव आणि अर्थाचा अभाव असे करतात. पहिल्या स्थितीत अर्थ प्रबळ होऊन तो धर्माचा लोप घडवतो. अशा अवस्थेत काम-पुरुषार्थाचा अतिरेक होऊन, शोषणाधारित व्यवस्था निर्माण होतात. अर्थाचा प्रभाव जिथे निर्माण होतो, तिथे अन्य व्यक्तींच्या अभिव्यक्तीचा संकोच होऊन त्यांच्या अर्थ-पुरुषार्थाची यथार्थ परिपूर्ती होण्यास आवश्यक अवकाशाचा लोप होतो. याउलट अर्थाचा अभाव निर्माण झाल्यास स्वतः त्या व्यक्तीसच स्वतःचा अर्थ-पुरुषार्थ साधणे दुष्प्राप्य होऊन, त्यातून त्या व्यक्तीच्या काम-पुरुषार्थाचाही लोप होतो. अशा परिस्थितीतून आत्यंतिक चक्रीय दारिद्य्र किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्याचा धोकाही संभवतो. दोन्ही परिस्थितींचा समाजात प्रादुर्भाव झाल्यास, समाजात एक प्रकारची दुफळी माजून संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही व्यवस्था, अशा प्रकारच्या दुभंग समाजस्थितीस प्रगतीची पूर्वस्थिती मानतात.नित्य संघर्षातून कार्यक्षमतेचे नवनवीन उच्चांक गाठले जात असल्याचे भांडवलशाही मानते, तर साम्यवादाला त्याच संघर्षातून कष्टकरी जनतेचे साम्यवादी राज्य स्थापन होण्याची बीजे दिसतात. भारतीय चिंतनानुसार मात्र या दोन्ही स्थिती, अर्थ-पुरुषार्थाचे संवहन धर्माच्या आधारे होत नसल्याच्या निदर्शक आहेत.
 
 
अर्थ-काम पुरुषार्थांसाठी धर्माच्या आधाराचे भारतीय तत्त्व जसे सामाजिक स्थिरता प्रदान करण्यास आवश्यक आहे, तसेच वैयक्तिक सौख्याच्या प्राप्तीसाठी मोक्ष संकल्पनेद्वारा होणारे नियमनही संकल्पनात्मक स्पष्टतेसाठी आवश्यक आहे. अब्राहमिक रिलिजनमधील जगदंताचा सिद्धांत भोगमय पारलौकिक जीवनाचा आदर्श सांगतो. अपरिमित कामेच्छांची पूर्ती होणार्‍या परलोकाची संकल्पना आणि शरीर टिकवून जगदंतापर्यंत वाट पाहण्याचा मार्ग हा इहलोकातसुद्धा अपरिमित भोगांची कल्पना करतो, यात नवल नाही. परलोकाची भारतीय संकल्पना ही देहविहीन अवस्थेत, केवळ शुद्ध आत्मरूपाने परमेश्वराचे सामीप्य मिळवण्यापासून त्याच्याशी सायुज्य प्राप्त करण्यापर्यंत आहे. इंद्रियविहीन अवस्थेत इंद्रियभोगांचे स्थानच उरत नाही. त्याच निर्गुण अवस्थेचे इहलोकातील प्रकटीकरण, निष्काम कर्मातून होते. भारतीय अर्थविचाराची भिन्नता पाहताना, मानवी जीवनाच्या इतिकर्तव्यतेचा भिन्न विचार आणि त्याचा अर्थ-काम पुरुषार्थांच्या आकलनावरील प्रभाव समजून घेणेही महत्त्वाचे आहे.
 
 
अर्थविषयातील धर्माधारित भारतीय चिंतन आणि जडवादी पाश्चात्य चिंतन यांचा तौलनिक विचार केल्यास हे स्पष्ट आहे की, शाश्वत स्वरूपाचे अर्थचिंतन केवळ भारतीय विचारांच्या अवलंबनातूनच शय आहे. धर्माचे कार्यच समाजाची धारणा करणे हे असल्याने, धर्माधारित अर्थचिंतन हेच मानवी प्रगतीसाठी आवश्यक शाश्वत तत्त्वांचे प्रतिपादन करू शकेल, हे सुस्पष्ट आहे. परंतु, पाश्चात्य चिंतनातील गणिताधारित विश्लेषण पद्धतीचा अर्थविषयक प्रत्यक्ष धोरणे ठरवण्यातील उपयोग अनन्यसाधारण आहे. भारतीय गुणात्मक विश्लेषण पद्धतीला योग्य प्रकारे संख्यात्मक विश्लेषणाची जोड दिल्यासच, भारतीय अर्थचिंतन एका भक्कम पायावर उभे राहू शकेल. पाश्चात्य गणिती पद्धतीआधारे आणि भारतीय धर्मनियमित अर्थ-कामाचा तत्त्वविचार ध्यानात घेऊन, शाश्वत विकासासाठी आवश्यक असे एक अर्थचिंतन उभे करणे, हीच आजची गरज आहे.
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी.’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
 
 

डॉ. हर्षल भडकमकर

मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.