मुंबई : ( Diwali ) दिवाळी म्हटलं की कंदिल, फटाके, फराळ या साऱ्यांची मेजवाणी आपण अनुभवतो. त्याचबरोबर सांस्कृतिकदृष्टया दिवाळी सर्वसंपन्न होते ती वेगवेगळ्या दिवाळी अंकांमुळे. मराठी संस्कृतीला दिवाळी अंकांची खास परंपरा आहे. मागच्या ७ दशकांहून अधिक काळ, समाजामध्ये प्रबोधनाचे, नाविन्याचे विचार पेरण्याचे कार्य दिवाळी अंकांच्या माध्यमातून पार पडले आहे. काळाच्या ओघात दिवाळी अंक डिजिटल झाले असले तरी सुद्धा छापील दिवाळी अंकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवाळी अंकांचा विचार करायाचा झाल्यास असे लक्ष्यात येते की, सातत्याने वेगवेगळे प्रयोग आपल्या अवतीभोवती बघायाला मिळतात. याच दृष्टीने त्यांची दखल घेणे गरजेचे आहे.
सृजनसंवाद दिवाळी अंकाचे हे सध्या ५ वे वर्ष असून, यंदा 'स्वप्न' हा विषय मध्यवर्ती ठेवून, अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. झोपेत पडणारी स्वप्नं, दिवास्वप्नं, आणि त्याच बरोबर अशी काही स्वप्नं ज्यांचा आपण ध्यास घेतो. या आणि अशा वेगवेगळ्या स्वप्नांच्या मनोरथाचा विचार या दिवाळी अंकामध्ये करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ नंदू मुलमुले यांच्यापासून ते युवा लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांचे लेखन वाचकांना या अंकामध्ये वाचकांना वाचायाला मिळणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ कथाकार चांगदेव काळे, प्रतिभा कणेकर, ऐश्वर्य पाटेकर अशा दिग्गजांचे लेखन वाचकांना अनुभवायाला मिळणार आहे.
'भवताल - हवा पाणी पर्यावरणाचा आरसा' या अंकाच्या केंद्रस्थानी आहेत 'वाटा' म्हणजेच रस्त्यांचा प्रवास. आपल्या दैनंदिन जीवनात आपण रस्ता, त्यावरील लोहमार्ग, तर कधी हवेतील व पाण्यवरचा रस्ता हा आपल्या जीवनाचा भाग असतो. हडप्पाकालीन मार्ग, प्राचीन काळातील व्यापाराचे जाळे इथपासून ते अंतराळातील मार्ग अशा व्यापक विषयांचा ऊहापोह या अंकामध्ये घेण्यात आला आहे.
हे वाचलत का ? - प्रख्यात कवी अशोक बागवे यांच्या हस्ते ‘आश्लेषा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न
प्रत्येकवर्षी एका आगळ्या वेगळ्या विषयाला वाहिलेल्या वाघूर या दिवाळी अंकाचा केंद्रस्थानी विषय आहे लग्न. लग्न हा दोन जीवांच्या मंगलमय जिव्हाळ्याची घटना. या नात्याला शब्दपुष्पांनी उजळवण्याचे कार्य या अंकाच्या माध्यमातून केले गेले आहे. काळाच्या ओघात आपल्या विवाहसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. आजच्या तरुणाईसमोर लग्न या संस्थेविषयी अनेक प्रश्न आहेत, नात्यांकडे बघायाचा त्यांचा स्वताचा वेगळा दृष्टीकोन आहे. याच संदर्भात हा दिवाळी अंक अनेक नव्या गोष्टींना उजाळा देतो.