दिवेअंजुर गावातील ग्रामस्थांसाठी विविध सुविधांचे लोकार्पण

20 Oct 2025 15:26:23

Kapil Patil 
 
भिवंडी : ( Inauguration of Development Works in Diveanjur Village Through Kapil Patil’s Efforts ) भिवंडी तालुक्यातील दिवेअंजुर गावातील ग्रामस्थांना विविध नागरी सुविधा पुरविणाऱ्या कामांचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले. गावातील नागरिकांना गरजेच्या व आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंचांसह पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे, अशी सूचना कपिल पाटील यांनी केली.
 
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून विविध नागरी कामांसाठी सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावातील शंकर मंदिरात झालेल्या कार्यक्रमात सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी मजूर संस्थेचे माजी अध्यक्ष सुधाकर म्हात्रे, `टीडीसीसी'बॅंकेचे संचालक प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, माजी नगरसेवक सुमित पाटील, माजी सरपंच सिद्धेश पाटील, सरपंच वैजयंती नामदेव पाटील, आकाश म्हात्रे,उपसरपंच नंदलाल प्रकाश पाटील, तानाजी बाळाराम पाटील, रविंद्र एकनाथ पाटील, पंढरीनाथ बाळाराम पाटील, पंडित कुंडलिक म्हात्रे, आत्माराम सखाराम पाटील, शैलेंद्र म्हात्रे, हेमंत पाटील, पंढरीनाथ पाटील आदी उपस्थित होते.
 
हेही वाचा - अनाथ मुलांसोबत मंत्री पंकजा मुंडे यांची आगळीवेगळी दिवाळी
 
या सुविधांमध्ये `जल जीवन मिशन'अंतर्गत नवीन जलकुंभ, स्व. पुरुषोत्तम मोरेश्वर पाटील व्यायामशाळा, घनकचरा प्रकल्प, ओमशिव महिला मंडळ हॉल, ई-लायब्ररी, दोन बस स्टॉप, गावात प्रवेशासाठी दोन प्रवेशद्वार, तीन हायमास्टचे उद्घाटन, महिला भगिनींसाठी हॉल, अंगणवाडी केंद्र, बंदरावरील स्मशानभूमीचे नुतनीकरण, धापरावरील स्मशानभूमीचे सुशोभीकरण, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी टीव्ही व वह्यावाटप, क्रिकेट मैदान आदींचे लोकार्पण करण्यात आले.
 
 हे वाचलत का ? - प्रख्यात कवी अशोक बागवे यांच्या हस्ते ‘आश्लेषा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न
 
यापुढील काळातही ग्रामस्थांना आणखी सुविधा व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली. तर या कामांसाठी केलेल्या सहकार्याबद्दल सरपंच वैजयंती नामदेव पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
 
 
Powered By Sangraha 9.0