मुंबई : ( Exhibition of Indigenous Products at Mahatransco ) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण)वतीने दि. १३ ते २१ ऑक्टोबरपर्यंत दिवाळीनिमित्त स्वदेशी वस्तू व उत्पादनांचे प्रदर्शन राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्य कार्यालयाच्या प्रकाशगंगा इमारतीत स्वदेशीचा जागर उपक्रमांतर्गत सेंद्रीय अन्नपदार्थ आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे, याबाबतचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्रदर्शनाला अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आत्मनिर्भर भारत ही संकल्पना घेऊन स्वदेशी वस्तूंचा वापर व प्रचार व्हावा, यासाठी महिला बचत गटांनी तयार केलेल्या प्रदर्शनाला महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, संचालक (वित्त) तृप्ती मुधोळकर, अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांनी प्रदर्शनाला भेट देऊन महिलांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करून त्यांच्याकडून स्वदेशी वस्तू खरेदी केल्या.
यामध्ये गोमय पणत्या, देशी आकाशकंदील, देशी फराळ, आयुर्वेदिक पदार्थ व वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. तसेच उटणे, अगरबत्ती, बॅग्ज, इमिटेशन ज्वेलरी, धार्मिक पुस्तके, रांगोळी, कडधान्ये, सेंद्रिय डाळी, साबण, विविध प्रकारचे आकर्षक तोरण, बांबूच्या आकर्षक वस्तू आदींसह खाद्यपदार्थ यांच्यासह विविध वस्तू व उत्पादने विक्रीला आहेत. खरेदीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
महिला स्वावलंबी व्हाव्यात, आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना रोजगार मिळावा, तसेच स्वदेशी वस्तूच्या मालाला चालना मिळावी, या हेतूने महापारेषणने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. तरी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापारेषणकडून करण्यात आले आहे.
हे वाचलत का ? - आकाशदिव्यांची मांदियाळी
सेंद्रीय अन्नपदार्थ आरोग्यासाठी पोषक : डॉ. संजीव कुमार
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी प्रदर्शनातील सर्व स्टॉलला प्रत्यक्ष भेट देऊन महिलांना प्रोत्साहित केले. तसेच त्यांच्याकडून स्वदेशी वस्तू व उत्पादने खरेदी केली. विशेष म्हणजे सेंद्रिय कडधान्यांच्या स्टॉलला भेट देत तेथील पदार्थांची चव चाखली. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ. संजीव कुमार यांनी सेंद्रीय अन्नपदार्थांचे महत्त्व सांगितल्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रीय कडधान्यांची खरेदी केली.