प्राचीन ग्रंथांमधील दीपावली दर्शन...

    19-Oct-2025
Total Views |

DIWALI
 
भारतीय सण-उत्सव हे नेहमीच उत्साहवर्धक असतात. कारण, ते ऋतूंशी संबंधित आहेत. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती असल्याने शेतीसंबंधित सण-उत्सव आपल्याला भारतात विशेषत्वाने दिसतात. यामध्ये भारतीय संशोधकांचे एक मोठे ऋण आपल्यावर आहे. त्यांचा अल्पपरिचय वाचकांना व्हावा, म्हणून हा लेखप्रपंच खास दिवाळीनिमित्ताने, अर्थात दिवाळी समजून घेण्यासाठी. त्यामुळे कदाचित हा लेख नेहमीच्या लेखनापेक्षा वेगळ्या शैलीतील वाटेल; कारण यात पुस्तकांचे, संशोधनाचे संदर्भ नोंदवले आहेत.
 
STUDIES IN THE HISTORY OF HINDU FESTIVALS-SOME NOTES ON THE HISTORY OF DIWAFESTIVAL - (BETWEEN C.-.D. 50-ND 1945) Author(s) : P. K. Gode Source: Annals of the Bhandarkar Oriental Research Institute, July-October 1945, Vol. 26, No. 3/4 (July-October 1945), pp. 216-262 Published by : Bhandarkar Oriental Research Institute. या संशोधन लेखाचा अभ्यास करताना वाटले की, यातील काही वाचनीय भाग सर्वांसाठी सोप्या भाषेत मांडावा, जो आपल्याला दिवाळी या सणाचे प्राचीन रूप समजावून सांगेल. चला तर मग थोडी ग्रंथांची सफर करून येऊया.
 
भारताचे नंदनवन अर्थात काश्मीर. याचे प्राचीन नाव ‌‘कश्यपमेरू.‌’ ‌‘नीलमत पुराण‌’ हे तत्कालीन काश्मीरमधील सण-उत्सव आपल्याला सांगते, ज्यामध्ये ‌‘दीपमाला‌’ किंवा ‌‘सुख सुप्तिका‌’ या सणाचा उल्लेख दिसून येतो.

रात्रौ दीपश्च दातव्यो मासमेकं
बहि: गृहात्‌|
यावत्‌‍ कार्तिक मासस्य
पौर्णमासीं द्विजोत्तम॥409॥
एषा तु कौमुदी नाम तिथि:
कार्या शिवप्रदा|
तत: पक्षे व्यतीते तु कर्तव्या
सुख सुप्तिका॥410॥
-नीलमत पुराण
 
(Dr. Ved Kumari, 1973, The Nailmata Mahapuran, Jammu and Kashmir Academy of Art, Culture and Languages, Srinagar.)
 
म्हणजेच कार्तिक महिन्याच्या पौर्णिमा तिथीपर्यंत एक महिना घराच्या बाहेर दिवा लावावा. याला ‌‘कौमुदी उत्सव‌’ म्हणतात. कारण, हे चांदणे आशीर्वाद देणारे आहे. यानंतरचे 15 दिवस आनंदाने आणि सुखाने निद्रा करण्याचे म्हणजेच समाधानाचे असतात. म्हणून याला ‌‘सुख सुप्तिका‌’ म्हणतात. सूर्यास्तानंतर लक्ष्मी देवीची उपासना करावी. त्यासाठी मंदिरे, रस्ते, स्मशानभूमी, नदीकाठ, डोंगर, घरे, वृक्षांच्या तळाशी, गोठ्यात, अंगणात आणि दुकानांमध्ये मातीचे दिवे किंवा पणत्या प्रज्वलित कराव्यात आणि उत्सवाचा आनंद घ्यावा, असे नीलमत पुराण सांगते.
 
भारतात जन्माला आणलेल्या शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य या संप्रदायांचे विशेष असे सण आहेत. अनुक्रमे महाशिवरात्री, गोकुळाष्टमी, शारदीय नवरात्र, गणेश चतुथ इत्यादी. ही खरंतर व्रते आहेत; पण आपण ती उत्सव या स्वरूपातही साजरी करतो. या जोडीने ऋतुचक्रावर आधारित असलेले सण म्हणजे नारळी पौर्णिमा, दिवाळी, मकरसंक्रांती इत्यादी. दिवाळी या सणाचा संबंध हा स्थानिक ऋतुचक्राशी जोडलेला आहे.
 
वैदिक काळात आश्विन पौर्णिमेला ‌‘आश्वयुजी कर्म‌’ केले जात असे. ही एक छोटी इष्टी म्हणजे छोटासा यज्ञच असे, ज्यामध्ये शेतातील नव्या धान्याची आहुती दिली जायची. म्हणूनच आश्विन पौर्णिमेला म्हणजेच कोजागरीला ‌‘नवान्न पौर्णिमा‌’ असे म्हटले जाते. या दिवशी गोठ्यातील गायी-गुरांना सजविणे, नव्या धान्यापासून पदार्थ तयार करणे आणि ते सर्वांनी एकत्र येऊन सेवन करणे, घराची स्वच्छता करणे अशा गोष्टी केल्या जात. हे वाचलं की, आपल्यासमोर येते ती दिवाळी.
 
महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी! त्यांचे शिष्य म्हाईमभट्ट यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे ‌‘लीळाचरित्र.‌’ चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ आपल्याला तत्कालीन सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक जीवनाची ओळख करून देतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या समकालीन असलेला हा संप्रदाय!
 
लीळाचरित्रात वर्णन असलेली दिवाळी कशी होती? तर ही अशी होती, भाषा वेगळी वाटेल; पण ती मुळातून समजावी, म्हणून त्याच शब्दांत वर्णन नोंदविले आहे.
 
माहादाइसों माहात्मेयां
दोवाळी सणु करवणें
 
माहादाइसीं वीनवीलें : जी जी : मी गोसावीयांचां ठाईं दीवाळी सणु करीन: सववेज्ञे म्हणीतलें : माहात्मेयांसहीतु करा : तुमतें असे तें तुम्हीं करा : न पुरे तें बाइसांतें मागा: हो कां जी: मग सांजवळे‌’ माहादाइसीं पाणीयांची‌’ सामग्री केली : चीकसा : तेल : उमाइसांचां घरूनि आणिला : मग प्रातकाळीं‌’ गोसावीयांसि उपहड जाला : गोसावीयांसि आसन रचिले : भगतिजनां पाट पासवडिले : जोन्हळेयांचा चौकु भरिला : गोसावी आसनीं उपवीष्ट जाले : भगतिजन गोसावीयांसेजे बेसळे : माहादाइसीं गोसावीयांसि ओवाळणी केली : भगतिजन ओवाळिले : गोसावीयांसि वीडा ओळगविला : भगतिजनासि तांबोळें दीधलीं : सववेज्ञे म्हणीतलें : तांबोळ घेया गा‌’: मग गोसावीं माहादाइसांसि तांबोळ दीधलें : गोसावीयांसि मदेना दीधली : उरलेया चीकसेयाआंतु आणीकु चीकसा घातला : तो भगतिजनांसि दीधला : भगतिजनीं एकमेकांचीं आंगें उटिलीं : गोसावीयांचां श्रीमुगुटीं तेल ओळगविलें : उरलें तेल : तेया आंतु आणीक तेल घातलें : एंसें भगतिजनासि दीधलें : एकमेकांचे माथे माखिले : मग गोसावीयांसि सोंडीएवरि आसन जालें : श्रीमुगुटीं भोगी ओळगविली : श्रीमुगुटिचेया पीळयाआंतु आणीक भोगी घातली : ऐसी भगतिजनासि दीधली : भगतिजनांचे माथे माखिले : मग गोसावीयांसि मादणे जालें : माहांदाइसें गाडु ढाळीति : बाइसें श्रीमुगुटु चोखीति : श्रीमुति प्रक्षाळीति: भगतिजन सोंडिएतळि रीगौनि‌’ गोसावीयांचेनि उदकें न्हाले : सेवटीं श्रीमुगुटावरि गाडु ढाळीति : गोसावी श्रीकर दोन्हीं श्रीमुगुटावरि ठेवीति : दोहीं कोंपरिचेनि पाणीएं भगतिजन न्हाति : एंसें गोसावीयांसि मादणे जालें : मागोतें गोसावीं वहुतें पाणिएं न्हाणवीलें : भगतिजन : मग माहादाइसीं आक्षेवाणें आणिलें : गोसावीयांसि ओवाळिलें : मग गोसावीं वस्त्रें वेढिलीं : आसनीं उपवीष्ट जाले : चंदनाचा आडा रेखिला‌’ : मग गोसावीयांसि ओवाळणी जाली : भगतिजन ओवाळिले : मग दीसु निगाला : बाइसीं आपुला नीमस्तु‌’ पुजाअवस्वरू केला : मग गोसावीं वीह्रणासि बीजे केलें : माहादाइसीं उपाहारु नीफजविला‌’ : गोसावीं वीहरणौनि बीजें केलें : पुजाअवस्वरू जाला: गोसावीयांसि ताट जालें: भगतिजनांसि ठाए जाले : मग माहादाइसीं ओवाळिलें : गोसावीयांसि आरोगण जाली : भगतिजनासि जेवणें
 
जालीं : गुळुळा वीडा जाला : ऐसा गोसावीयांसि भगतिजनासहीतु दीवाळी सणु जाला :॥ | |
(लीळाचरित्र, संपादक - डॉ. कोलते वि. भि., महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ प्रकाशन, सप्टेंबर 1978, पृष्ठ 281)
 
भक्तांनी गोसाव्यांसह साजरी केलेली ही दिवाळी. गोसावी म्हणजे महंत, स्वामी. त्यांचा आदर राखत त्यांच्यासह दिवाळी सण साजरा करण्यासाठी महादाइसा यांनी स्वामींना विनंती केली आणि चक्रधर स्वामींनी ती मान्य केली. महादाइसा या संन्यासिनी असून चक्रधर स्वामींच्या शिष्या होत्या. उत्सव साजरा करताना काही हवे असेल, तर बाईसा यांच्याकडे जिन्नस मागावेत, असेही स्वामींनी त्यांना सांगितले.
 
दिवाळीच्या आदल्या संध्याकाळीच तयारी सुरू झाली. महादाइसा यांनी सर्वांसाठी पुरेसे पाणी भरून ठेवले. आपल्या मोठ्या बहिणीच्या घरून तेल आणि उटणे आणून ठेवले. चक्रधर स्वामींसाठी सकाळी धान्याचा चौक आखला गेला. त्यांचे आसन मांडले गेले. महादाइसा यांनी स्वामींच्या डोक्याला तेल लावून दिले. अन्य भक्तांनी एकमेकांना तेल लावले, उटणे चोळून दिले. हे झाल्यावर स्नान झाले. सर्वांना महादाइसा यांनी औक्षण केले. स्वामींना चंदनाचा तिला लावला. तांबूल-पान सुपारी दिली गेली. दुपारी सर्वांनी एकत्र स्नेहभोजन केले आणि स्वामींचा प्रसाद ग्रहण केला. अशी ही गुरू आणि शिष्याची भक्तीने भरलेला दिवाळी!
 
बाराव्या शतकातील जैन आचार्य हेमचंद्र यांचा ‌‘देशीनाममाला‌’ हा ग्रंथ. या प्राकृत शब्दकोशात आलेला ‌‘जक्खरत्ती दीपाका’ म्हणजे ‌‘यक्षरात्री दीपिका म्हणजे दिवाळी. अमावास्येच्या रात्री दिवे प्रज्वलित करणे असा अर्थ यामध्ये अभिप्रेत आहे, असे अभ्यासक नोंदवितात.
 
जच्छंद्‌‍ ओ मतन्तम्मि जक्खरनी अ दीवाीं| जण्णोदणो णिमिथरे
जंधाकंओ अ चच्चरए॥ 436॥
जच्छंदओ सच्छन्द्ः| कप्त्ययामावे जच्छेदो| जक्खरत्ती दीपाकाि|
जण्णोहणो राक्षसः|
जघाछेओ चत्वरम्‌‍॥ यथां|

(R. Pische (Editor) 1938, Hemachandra's Desinammala edited with Critical Notes, Bombay Sanskrit Series-No XVII-Edition Second)
 
या आणि अशा अभ्यासातून, संशोधनातून उलगडत जाते दिवाळी. आपणही असा सणांचा इतिहास शोधूया, त्यामागील अर्थपूर्णतः समजावून घेत ते साजरे करूया. येणारी दिवाळी इतिहासाच्या प्रकाशातील आपल्या संस्कृतीची उधळण करीत येवो, अशी सदिच्छा!
 
- डॉ. आर्या जोशी
9422059795