मुंबई : ( Railway station ) औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. शासनातर्फे यासंदर्भात अधिसूचना (राजपत्र) काढण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर रेल्वे स्थानकाचेही नाव बदलावे असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता. केंद्राने देखील या निर्णयाला मान्यता दिली त्यामुळेच आता रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले.
राज्यात २०२२ मध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आला. त्यानंतर खा. डॉ. भागवत कराड यांनी रेल्वे स्थानकाचे नाव देखील बदलावे, यासाठी रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. त्याधर्तीवर रेल्वे खात्याने स्थानकाचे नाव औरंगाबाद वरून छत्रपती संभाजीनगर करण्याचे राजपत्र शासनाने काढले. आता अधिकृतरित्या छत्रपती संभाजीनगर असे नाव झाले आहे.
औरंगाबाद शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झालं असलं तरी आपण केलेल्या मागणीप्रमाणे रेल्वे स्थानकाचं नामकरण झालं नव्हतं. याबाबत आपण वेळोवेळी पाठपुरावा करत सरकारला विचारणा केली होती. आनंद आहे की महाराष्ट्र शासनानं केंद्रीय अधिनियमान्वये यासंदर्भात नियम व आदेश लागू करत ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव रेल्वे स्थानकाला देण्यासंदर्भात राजपत्र जारी केलं आहे. सरकारचे आभार… अत्यंत हर्ष आहे की यापुढे स्थानकावर धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंचं नाव गौरवपूर्वक झळकेल.
- विनोद पाटील, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने अधिसूचना जारी करून औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असे केले आहे. हा नामविस्तार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या मंजुरीनंतर करण्यात आला आहे.
हा निर्णय पराक्रमी, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवशाली परंपरेस अभिवादन करणारा आणि अभिमानास्पद आहे.
या निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
जय महाराष्ट्र!
जय छत्रपती संभाजी महाराज!!
- विजया रहाटकर, अध्यक्षा, राष्ट्रीय महिला आयोग