एकीकडे अफगाण-पाकिस्तान सीमा पेटलेली असतानाच, सवयीप्रमाणे जनतेचे लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताला पुन्हा आण्विक हल्ल्याची धमकी दिली. गेल्यावेळी दिलेल्या धमकीनंतर आणि पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याच्या पार्थ पराक्रमाने सार्या जगाचेच डोळे दिपले होते. यामध्ये भारतीय लष्कराबरोबरच नेतृत्त्वाचा कणखरपणाही प्रकर्षाने जाणवला होता. त्यानिमित्ताने ‘ऑपरेशन सिंदूर’ काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या असामान्य नेतृत्वगुणांचा घेतलेला हा आढावा...
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील चकमक
दि. ११ आणि दि. १२ ऑटोबर रोजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर झालेल्या चकमकींमुळे, दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या चकमकीत पाकिस्तानचे ५०हून अधिक सैनिक मारले गेले असून, तालिबानने पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौया आणि काही रणगाडेही ताब्यात घेतले आहेत. इतकेच नव्हे तर कंदाहारच्या मेवंद जिल्ह्यात, पाच पाकिस्तानी सैनिकांनी तालिबानसमोर आत्मसमर्पण केल्याचेही वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी माध्यमांनी असा दावा केला आहे की, त्यांच्या सैन्यानेही अफगाण चौया आणि दहशतवादी अड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, अनेक अफगाण सैनिकही या कारवाईमध्ये मारले गेले आहेत. मात्र, तालिबानकडून होणारे सततचे हल्ले आणि हवाई कारवायांमुळे, पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात अस्थिरता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानसमोरचे ‘तीन आघाड्यांवरील’ आव्हान
सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था अत्यंत गंभीर आणि आव्हानात्मक झाली आहे. पकिस्तानला एकाच वेळी तीन वेगवेगळ्या आघाड्यांवर संघर्ष करावा लागत आहे;
भारत-पाकिस्तान सीमा : ही पाकिस्तानसाठी नेहमीच तणावाची पहिली आघाडी राहिली आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा : तालिबानकडून वारंवार होणारे हल्ले आणि वाढलेल्या चकमकी.
देशांतर्गत अस्थिरता : पाकिस्तानच्या एकूण सैन्यापैकी जवळपास ५० टक्के सैन्य हे देशांतर्गत भागांत दहशतवादी अभियान किंवा स्वातंत्र्य चळवळी चालवणार्या बलुच आणि पख्तून सैनिकांशी लढण्यात गुंतलेले आहे.थोडयात, पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेची स्थिती सध्या कसोटीला लागली आहे.
याच काळात तालिबानचे परराष्ट्रमंत्री मागील आठवड्यात भारतात येऊन गेले. त्यामुळे अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील सामरिक सहकार्य आणखीनच दृढ होण्याचे संकेत मिळत आहेत. या घटनाक्रमामुळे पाकिस्तान सध्या अत्यंत अस्वस्थ आणि चिंतेत आहे. कारण, भारत-अफगाणिस्तानचे वाढते संबंध, त्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात.
‘ऑपरेशन सिंदूर’ : नेतृत्वाची निर्णायक झलक
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या विविध कारवाया आणि पराक्रमाविषयीची माहिती, वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाली. मात्र, या यशस्वी अभियानाच्या वार्तांकनात एक महत्त्वाचा आणि निर्णायक मुद्दा कमी चर्चिला गेला, तो म्हणजे या संपूर्ण ऑपरेशनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले अतुलनीय आणि कणखर नेतृत्व. दहशतवादाविरुद्धच्या या निर्णायक लढाईत त्यांच्या भूमिकेमुळेच भारताला अभूतपूर्व विजय मिळाला. या लेखात ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी पंतप्रधानांनी देशाला दिलेल्या याच निर्णायक नेतृत्वाचे आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत.
पूर्वीचे भारताचे नेतृत्व
पूर्वी भारताचे नेतृत्व भारत-चीन सीमेवर, लडाखमध्ये रस्ते बांधण्यास घाबरायचे. कारण, त्यामुळे चीन नाराज होईल अशी भीती होती. पण, आता परिस्थिती बदलली आहे. आता आपण चीनची परवा न करता, निर्भयपणे आणि ठामपणे रस्ते बांधत आहोत. पूर्वी जेव्हा पाकिस्तान दहशतवादी हल्ला करायचा, तेव्हा आपले नेतृत्व फक्त निषेध नोंदवायचे आणि अमेरिकेला ‘पाकिस्तानवर नियंत्रण आणा’ अशी विनंती करायचे. आज मात्र, आपण अमेरिका किंवा कोणत्याही महासत्तेला विचारत बसत नाही; आपल्या राष्ट्रीय हिताचे निर्णय स्वगौरवाने आणि स्वबळावरच घेतो.
पूर्वी लष्करी ताकद असूनही ‘स्ट्रॅटेजिक रेस्ट्रेन्ट’ या नावाखाली ती वापरण्यास टाळाटाळ केली जात असे. ती शक्ती केवळ प्रजासत्ताक दिनाच्या परेडपुरतीच दिसे. आता मात्र ते चित्र बदलले आहे. चीन, पाकिस्तान किंवा अमेरिका कोणीही असो, त्यांची परवानगी किंवा भीती न बाळगता, आपण आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण ठामपणे करत आहोत.
परिवर्तनाच्या मागे सध्याचे नेतृत्व
‘ऑपरेशन सिंदूर’ हे आधुनिक भारताच्या लष्करी आणि राजकीय इतिहासातील एक निर्णायक पान ठरले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक कारवाई केली. या हल्ल्याला भावनिक आणि प्रतीकात्मक अर्थ देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नावही दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या महिलांचा सिंदूर पुसला गेला होता, त्यांचा बदला घेण्याची राष्ट्रनिष्ठ प्रतिज्ञाच होती ती.
पहलगाम हल्ल्याचा प्रत्युत्तरात्मक संकल्प
पहलगाम येथील निर्दयी हल्ल्यात धार्मिक ओळखीनुसार पर्यटकांना लक्ष्य केले गेले. या घटनेने देशभरात तीव्र संतापाची लाट पसरली. पंतप्रधान मोदींनी या हल्ल्याला केवळ सुरक्षा नव्हे, तर राष्ट्रीय सन्मानाचा प्रश्न बनवून निर्णायक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला उत्तर म्हणून तोफगोळा डागण्यात येईल. या शब्दांतून दहशतवाद्यांना व पाकिस्तानला ठाम संदेश दिला गेला की, भारत यापुढे निष्क्रिय राहणार नाही.
न्यूलिअर ब्लॅकमेलला न जुमानणारा भारत
पाकिस्तानने नेहमीप्रमाणेच आण्विक हल्ल्याची धमकी देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की भारत कोणत्याही न्यूलिअर बोगीला भीक घालणार नाही. त्यांनी सांगितले की, भारताकडे आत्मरक्षणाची संपूर्ण क्षमता आहे आणि दहशतवादाचा स्रोत पाकिस्तानमध्ये असल्यास, प्रत्युत्तर तिथेच दिले जाईल. ही भूमिका भारताच्या आत्मविश्वासाची साक्ष देणारी होती.
रणनीती आणि नियोजनातील कौशल्य
‘ऑपरेशन सिंदूर’ची सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्याचे काटेकोर नियोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सुरक्षा यंत्रणा, लष्कर, नौदल, वायुसेना, तसेच गुप्तचर संस्था यांच्यात अभूतपूर्व समन्वय साधला. त्वरित निर्णय घेणे, अचूक माहिती संकलन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही या मोहिमेची वैशिष्ट्ये ठरली.
रात्रभर परिस्थितीवर लक्ष ठेवत, त्यांनी मंत्रिमंडळ आणि लष्करी नेतृत्वाशी थेट संवाद साधला. त्यांच्या नेतृत्वाखाली कारवाई निर्दोषपणे पूर्ण झाली, ज्याचे श्रेय त्यांनी सर्व सुरक्षा दलांना दिले.
सीमा पायाभूत सुविधा आणि युद्ध तयारी
गेल्या काही वर्षांत सीमावर्ती भागात, भारताने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या. रस्ते, पूल, टनेल्स, रेल्वे आणि अॅमडव्हान्स लॅण्डिंग ग्राऊंड्स इत्यादींच्या नेटवर्कमुळे, सैनिक आणि रसद वेळेत पोहोचवणे शय झाले. हे पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घकालीन दूरदृष्टीचेच फळ होते. यामुळेही ‘ऑपरेशन सिंदूर’ अत्यंत गतिशीलतेने पार पडले.
स्वदेशी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
या ऑपरेशनमध्ये स्वदेशी शस्त्रास्त्रे, ड्रोन, इलेट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टम आणि त्रिनेत्रसारख्या रिअल-टाईम युद्धनियंत्रण प्रणालींचा वापर प्रभावीपणे करण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे लक्ष्य अचूक साधता आले. यामुळेच भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण क्षमतेचा ठसाही जगभरात उमटला.
राजकीय इच्छाशक्ती आणि ऑपरेशनल फ्रीडम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलांना संपूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिले. राजकीय हस्तक्षेपाशिवाय निर्णय घेण्याची मुभा मिळाल्याने, लष्करी दलांनी आपल्या व्यावसायिक क्षमतेचा पूर्ण वापर केला. केंद्र आणि सैन्यातील विश्वास व समन्वयामुळे, हे अभियान यशस्वी झाले.
आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताची ठाम भूमिका
ऑपरेशननंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर, भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोदी सरकारने स्पष्ट भूमिका घेतली. दहशतवाद आणि त्याला पाठिंबा देणार्यांमध्ये फरक केला जाणार नाही. या भूमिकेमुळे, भारताचा कणखर आंतरराष्ट्रीय चेहरा जगासमोर आला. पाकिस्तानला युद्धविरामाची मागणी करावी लागली, यामुळे भारताचा कूटनीतिक विजय अधोरेखित झाला.
‘न्यू नॉर्मल’ची स्थापना
‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘बालाकोट एअर स्ट्राईक’नंतर, ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताच्या नवीन धोरणात्मक पॅराडायमची नोंद केली. भारताने स्पष्ट केले की भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर त्याचे प्रत्युत्तर पाकिस्तानच्या आत घुसून दिले जाईल. हे भारताच्या धोरणात्मक संस्कृतीतले ऐतिहासिक परिवर्तन होते.
जनतेचे आणि सैनिकांचे मनोबल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी थेट संवाद साधून, सैनिकांप्रति आदर व्यक्त केला. त्यांच्या भाषणांनी देशभरात एकात्मता निर्माण केली. जनतेचा उत्साह आणि सैन्याचा आत्मविश्वास या दोन्हींच्या संगमामुळे, राष्ट्रभावनेची नवचेतना निर्माण झाली.‘ऑपरेशन सिंदूर’ने केवळ पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही, तर पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ यांसारख्या संघटनांनाही मोठा धक्का दिला. दहशतवादाच्या मूळ ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांमुळे, जागतिक स्तरावर भारताचा प्रभाव वाढला.
निष्कर्ष
‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या राष्ट्रीय आत्मसन्मानाचे प्रतीक ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे, निर्णायक निर्णय क्षमतेमुळे आणि दीर्घकालीन दृष्टिकोनामुळेच भारताने दहशतवादाविरुद्ध एक नवीन शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण धोरण निर्माण केले. या ऑपरेशनने दाखवून दिले की, भारत आता फक्त संरक्षण करणारा देश नाही, तर आपल्या सुरक्षेचे आणि सन्मानाचे रक्षण करणारे निर्णायक शक्तीसंपन्न राष्ट्र आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी, रणनीतिक धैर्य आणि राष्ट्रभक्तीचे मूर्त स्वरूप आहे. यशस्वी नियोजन, तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर आणि लष्करी स्वातंत्र्य यामुळेच हे अभियान भारताच्या आत्मसन्मानाचा विजय ठरले.