युगप्रवर्तक घटना : एकीची शताब्दी, दुसरीची द्विशताब्दी

Total Views |

Rashtriya Swayamsevak Sangh
 
नियती मोठे गमतीदार योगायोग घडवून आणत असते. संपूर्ण जगासाठी थारेपालटी ठरणार्‍या दोन घटना १०० वर्षांच्या फरकाने एकाच तारखेला घडून याव्यात, याला काय म्हणावे?
 
एखादा माणूस जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडला जातो, तेव्हा सर्वप्रथम त्याला दोन गोष्टी समजतात. एक म्हणजे, या संघटनेची स्थापना डॉ. हेडगेवार नामक देशभक्ताने केली आणि दुसरी म्हणजे, ही स्थापना १९२५ सालच्या दसर्‍याच्या दिवशी करण्यात आली.
 
आता गंमत पाहा. संघ हिंदू समाजाच्या परंपरांचा सार्थ अभिमान बाळगतो. परंतु, संघस्थापनेचा दिवस विजयादशमीचा होता, हे अगदी अभिमानपूर्वक सांगताना, कार्यकर्ते, शालिवाहन शक कोणता होता, याचा उल्लेख न करता, १९२५ या इसवी सनाचा म्हणजेच ख्रिश्चन कालगणनेचा उल्लेख अगदी सहजपणे करतात आणि त्याचवेळी १९२५ या सनाची तारीख कोणती होती, हे मात्र त्यांना माहीत नसते.
 
मी स्वतः गेली ५० हून अधिक वर्षे संघकार्यकर्ता आहे. पण, १९२५ सालच्या दसर्‍याला इंग्रजी तारीख, महिना कोणता होता, हे मलाही माहीत नव्हते. माहिती करून घेण्याची गरजही कधी वाटली नाही. कदाचित, आमची संघटना विजयादशमीला जन्मलेली आहे. ती हिंदू समाजाला जयशाली, बलशाली करून विजयी होणारच, ही धारणा संघशाखेच्या संस्कारांनी इतकी पक्की झालेली आहे की, तारीख-महिना माहीत करून घेण्याची गरज पडली नसावी. आता संघशताब्दीच्या निमित्ताने संघाबाहेरच्या लोकांनी ती तारीख शोधून काढली. त्यामुळे समजली की, १९२५ सालच्या विजयादशमीला २७ सप्टेंबर ही इंग्रजी तारीख होती.
 
डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे नागपूर प्रांतातले लोकमान्य टिळकांचे उजवे हात समजले जात असत. ऐन तारुण्यातले डॉ. केशवराव हेडगेवार हे डॉ. मुंजे यांचे पट्टशिष्य होते. बाबू अरविंद घोष हे राजकीय जीवनाचा त्याग करून पुदुच्चेरी या तत्कालीन फ्रेंच वसाहतीत निघून गेले. डॉ. मुंजे आणि त्यांच्यासोबत डॉ. हेडगेवार बाबू अरविंदांना भेटायला पुदुच्चेरीला गेले. लोकमान्य टिळकांनी डॉ. मुंजेंबरोबर अरविंदांना निरोप धाडला होता. त्याचा आशय असा की, "मी तुमच्या नेतृत्वाबद्दल अतिशय आशा बाळगून आहे. तुम्ही राजकारण सोडू नका. परत या.” त्यावर अरविंदांनी लोकमान्यांना उलट निरोप पाठवला, "भारताला स्वातंत्र्य मिळण्याबाबतचा परमेश्वरी वटहुकूम निघून चुकला आहे. स्वतंत्र भारताला संपूर्ण जगासाठी काही विशेष कामगिरी करायची आहे. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी परमेश्वरी आदेशानेच मला इथे राहून कार्य करण्यास सांगण्यात आलेले आहे.”
 
आता व्यवहारिक पातळीवर पाहिले तर, योगी अरविंद जेव्हा इतया ठामपणे सांगत आहेत, त्या काळात ब्रिटिश साम्राज्य ही एक जागतिक महासत्ता होती. लष्करी, आरमारीदृष्ट्या इंग्रजांना कुणीही तुल्यबळ प्रतिस्पर्धीच नव्हता. म्हणजे, शस्त्रबळाने इंग्रजी राज्य उलथून पाडणे केवळ अशय होते. तसेच राजकीयदृष्ट्या इंग्रजी राज्ययंत्र (पोलिटिकल मशीन) इतके दृढ होते की, राजनीतीने इंग्रजी सत्ता घालवणे त्याहूनही अशय होते.
 
मग देशाला स्वातंत्र्य मिळणार केव्हा आणि कसे? आणि समजा मिळाले, तर असंघटित, विघटित, दुर्बळ; सामाजिक, राजकीय, सैनिकी अशा सर्वच दृष्टींनी छिन्नविछिन्न झालेला हिंदू समाज ते स्वातंत्र्य पेलू शकेल का? मग हा समाज एकसंध, बलवान झाला, तर स्वतंत्र होणे, ते स्वातंत्र्य टिकवून धरणे आणि मग पुढे अखिल जगासाठी, संपूर्ण मानवजातीसाठी काहीतरी कार्य करणे शय आहे.
 
दि. २७ सप्टेंबर १९२५ विजयादशमीला संघाची स्थापना करताना डॉ. हेडगेवारांच्या मनात समर्थ रामदासांची प्रेरणा, राष्ट्रीय पुनरुत्थानाची स्वामी विवेकानंदांची प्रेरणा यांच्यासह योगी अरविंदांच्या वरील उद्गारांचीसुद्धा प्रेरणा असावी. कुणीही, लिहून ठेवलेले नाही. संशोधनास प्रचंड वाव आहे. परंतु, हिंदू समाजाला आधी स्वतः संघटित, बलवान होऊन मग आपला देश, आपले राष्ट्र समर्थ बनवून, नंतर संपूर्ण मानवजातीसाठी मोठे कार्य करायचे आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून मी हे विधान करीत आहे की, दि. २७ सप्टेंबर १९२५चा दिवस हा फक्त भारतासाठी, फक्त हिंदूंसाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी फक्त युगप्रवर्तक दिवस होता.
 
आता आपण त्याच्यापूर्वी १०० वर्षे काय घडले, ते पाहूया. आपण पार शाळेपासून एक कथा ऐकत आलो आहेत. महान शास्त्रज्ञ जेम्स वॅट याने वाफेमुळे चहाच्या किटलीचे झाकण उडालेले पाहिले. त्याच्या डोयातील चक्रे वेगाने फिरू लागली. वाफेच्या या शक्तीने एखादे वाहन का चालवता येऊ नये, असे त्याच्या मनात आले आणि त्यातून अखेर वाफेच्या इंजिनाचा शोध लागला. आता ही घटना म्हणजे चक्क एक हरदासी कथा आहे. ती जेम्स वॅटचा मुलगा जेम्स वॅट धाकटा याने आपल्या बापाचा मोठेपणा समाजमनात ठसवण्यासाठी मुद्दाम प्रचलित केली. प्रत्यक्षात टॉमस न्यूकॉमेन या इंग्रज लोहाराने सन १७१२ साली वाफेवर चालणारे पहिले इंजिन बनवले. न्यूकॉमेन १६६४ साली जन्मला. १७१२ साली त्याने वाफेचे इंजिन बनवले. १७२९ साली तो मरण पावला. जेम्स वॉट (‘वॅट’ हा चुकीचा उच्चार होय) याने १७७६ साली न्यूकॉमेन आणि त्याच्या नंतरच्या संशोधकांनी बनवलेल्या वाफेच्या इंजिनाला एक वेगळा कंडेन्सर बसवला. यामुळे इंजिनाला ज्वलनासाठी कमी इंधन पुरले आणि कार्यक्षमता मात्र वाढली. जेम्स वॉटच्या संशोधनाचे क्रांतिकारकत्व हे आहे.
 
आपल्याकडचे अंध विज्ञानभक्त हा मजकूर वाचून लगेच आम्हा हिंदूंना हिणवणार, "बघा, बघा. इंग्रज लोक असे मोठमोठे शोध लावत असताना तुम्ही लोक काय करत होतात, तर फक्त मुलुख मारत, चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करत हिंडत होतात.”
सन १६६४ साली टॉमस न्यूकॉमेनचा जन्म झाला. त्यावर्षी आपल्याकडे शिवरायांनी सुरत तुटली होती. सन १७१२ साली न्यूकॉमेनने पहिले वाफेचे इंजिन बनवले, तेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आलेले छत्रपती शाहू महाराज हे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्याची पुनर्मांडणी करत होते. १७७६ साली जेम्स वॉटने वाफेच्या इंजिनात क्रांतिकारी सुधारणा केली. तेव्हा भाऊबंदकीमुळे धोक्यात आलेल्या हिंदवी स्वराज्याला स्थिर करण्यासाठी नाना फडणीस आणि महादजी शिंदे खंबीरपणे शत्रूंचा सामना करत होते. तात्पर्य, आम्ही स्वतंत्र होण्यासाठी, मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सतत गुंतून पडलो होतो. इंग्रज मुळातच स्वतंत्र होते. शास्त्रीय संशोधन करण्यासाठी लागणारी शांतता आणि सुव्यवस्था त्यांच्या समाजात होतीच.
 
असो. तर जेम्स वॉटचे संशोधन पुढे नेऊन जॉर्ज स्टीफनसन या आणखी एका महान इंग्रज संशोधकाने एक इंजिन बनवले. दि. २७ सप्टेंबर १८२५ या दिवशी या इंजिनाने ३२ डब्यांची एक गाडी खेचून नेऊन जगातल्या पहिल्या प्रवासी रेल्वेगाडीचा प्रारंभ केला. इंग्लंडमधल्या स्टॉकटन ते डार्लिंग्टन या सुमारे १२ मैल अंतराच्या प्रवासाला या गाडीने २५ मिनिटे घेतली. ‘लोकोमोशन-१’ असे नाव दिलेल्या या इंजिनाला प्रवाशांसाठी २० डबे, कोळसा भरलेल्या ११ वाघिणी (पक्षी ः वॅगन्स) आणि पहिल्या वेळचा म्हणून एक खास मोकळा डबा (पहिला डबा देवाला) असे एकंदर ३२ डबे जोडलेले होते.
 
हीदेखील संपूर्ण जगासाठी एक युगप्रवर्तक घटना होती. मालवाहतूक आणि माणसांची वाहतूक यांच्यासाठी घोडागाड्या, बैलगाड्या, उंट, खेचरे इत्यादी वाहनांचे दिवस फार वेगाने मागे पडले. इंग्लंडपाठोपाठ संपूर्ण युरोप खंडात आणि अमेरिकेतही रेल्वेमार्ग सुरू झाले. ते दर वर्षागणिक अधिकाधिक विस्तारू लागले. व्यापार आणि प्रवास अधिक सोपा झाला. जग जवळ येण्याची प्रक्रिया गतीने सुरू झाली. त्यामुळे दि. २७ सप्टेंबर १८२५ आणि दि. २७ सप्टेंबर १९२५ हे दोन्ही दिवस मोठे संस्मरणीय आहेत.
 
...आणि हिची तर त्रिशताब्दी!
 
मुंबई शहर मोठे झाले, ते शिवछत्रपतींमुळे. म्हणजे असे की, सन १६६४ आणि १६७० अशी दोनवेळा शिवरायांनी सुरतेची लूट केली. एवढा प्रबळ बादशहा औरंगजेब आपल्या मुघल साम्राज्याची आर्थिक राजधानी सुरतचे संरक्षण करू शकत नाही, हे पाहिल्यावर इंग्रजांनी ठरवले की, आपल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’चे मुख्यालय सुरतेहून मुंबईला हलवायचे. सन १६८७ पर्यंत त्यांनी हे काम पूर्ण केले. इंग्रजांचा अतिशय दूरदर्शी गव्हर्नर जेराल्ड अ‍ॅन्जियर याने एक फार महत्त्वाचा निर्णय घेतला. मुंबईच्या उत्तरेला पोर्तुगीजांचे राज्य होते आणि दक्षिणेला जंजिरेकर सिद्दीचे राज्य होते. पोर्तुगीज आणि सिद्दी भयंकर बाटवाबाटवी करीत. त्यामुळे त्यांच्या राज्यातली प्रजा हैराण होती. मुंबईच्या पूर्वेला शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होते. शिवरायांवर सतत आदिलशाही आणि मुघली सेनापती चालून येत असत. त्यामुळे तिथलीही प्रजा, विशेषतः व्यापारी हैराण असत. व्यापारी लोकांना शांतता आणि सुरक्षितता हवी असते. जेराल्ड अ‍ॅन्जियरने पोर्तुगीज, सिद्दी आणि शिवरायांच्या मुलखातल्या व्यापार्‍यांना आमंत्रण केले, "मुंबईला या आणि व्यापार करा. आम्ही तुमच्या धर्मात अजिबात हस्तक्षेप करणार नाही. उलट, तुम्हाला शांतता आणि संरक्षण देऊ.”
 
यामुळे १२ वाटांनी व्यापारी लोक मुंबईकडे आले. मुंबईचा फोर्ट-किल्ला हळूहळू मोठा होत गेला. चर्चगेट हा त्या किल्ल्याचा मुख्य दरवाजा होता. आज त्या जागेवर हुतात्मा चौक-फ्लोरा फाऊंटन उभे आहे. आता या फोर्टमधला सरकारी कामांसाठी लोक घोड्यांवरून, बैलगाड्यांतून, पालख्यांमधून यायचे. चर्चगेटच्या बाहेर तिष्ठत उभे राहायचे. किल्ल्यातून परवानगी येईपर्यंत त्यांना बाहेर थांबावे लागायचे. बाहेर संपूर्ण मोकळे मैदान होते. कुठेही पाणी नव्हते. माणसे आणि जनावरे फार तहानलेली राहायची. हे पाहून भीखा बेहराम पांडे नावाच्या पारशी व्यापार्‍याला वाटले की, आपण एक विहीर खोदावी. म्हणून त्याने स्वखर्चाने एक विहीर खोदली. ही गोष्ट सन १७२५ साली घडली.
 
आज ही भीखा बेहराम विहीर चर्चगेट रेल्वे स्थानकाकडून हुतात्मा चौकाकडे जाण्याच्या वाटेवर क्रॉस मैदानाच्या कोपर्‍यावर उभी आहे. गेली ३०० वर्षे फोर्ट परिसरातील लाखो लोक हिचे गोड पाणी पित आहेत. आधी विहिरीच्या पाण्याचा नळ मागच्या बाजूला होता. पण, यंदा विहिरीला ३०० वर्षे पूर्ण झाली म्हणून तो नळ पुढच्या बाजूला आणण्यात आला आहे. फोर्टमध्ये जाल, तेव्हा मुद्दाम या विहिरीच्या पाण्याची चव आवर्जून घ्या. मुद्द हा की, तहानलेल्या माणसांची आणि जनावरांची पाण्याची सोय करावी, असे इंग्रजांना नव्हे, तर फक्त एका भारतीय-पारशी माणसाला वाटले.
 
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.