मुंबई : (Mumbai Local) मुंबई लोकलमधील महिलेच्या प्रसुतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सर्वत्र या व्हिडिओची आणि व्हिडिओतील तरुणाची प्रशंसा केली जात आहे. हा व्हिडिओ आहे मुंबईतील राममंदिर स्टेशनवरील आणि त्यातील तरुण आहे विकास बेद्रे (Vikas Bedre). या तरुणाने आपल्या डॉक्टर मैत्रीण देविका देशमुखला (Devika Deshmukh) व्हिडिओ कॉल करत महिलेची प्रसूती केली आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय महिलेची प्रसुती करणारा थ्री इडियट सिनेमातील रँचो तर तुम्हाला माहितीच असेल, मात्र मुंबईतला मराठमोळा रिअल लाईफ रँचो सध्या भलताच चर्चेत आहे. मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. राम मंदिर रेल्वे स्टेशनवर कोणत्याही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. तेव्हा विकास बेद्रे या तरुणाने धाडस दाखवून, आपली डॉक्टर मैत्रिण देविका देशमुखला व्हिडिओ कॉल केला. डॉक्टर देविका यांनी विकास बेद्रेला व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप समजावून सांगितली. विकासनेही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार प्रत्येक सूचनेचं पालन केलं आणि रेल्वे स्थानकावर त्या महिलेची सुखरूप प्रसूती केली.
डॉ. देविका देशमुख या प्रसंगाबाबत माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "मला फोन आला तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना विचारले कि, जवळपास हॉस्पिटल आहे का? मात्र जवळपास हॉस्पिटल नव्हते. मला धक्का बसला. आता काही पर्याय उरला नसल्याने, मी त्यांना व्हिडिओ कॉलवरुन सर्व सूचना दिल्या. जवळच्या टपरीवरुन चाकू, लायटर आणला. लायटरने चाकू गरम करुन नाळ कापण्यात आली. मी दिलेल्या प्रत्येक सूचनेप्रमाणे विकासने काम केले. आम्हाला जे शक्य होतं ते आम्ही केले.
तसेच "तिला वाचवणे हे पहिले कर्तव्य आहे, असं मला वाटले, त्यातूनच आम्ही ही तत्परता दाखवली. विकासने विचारलं मी करु शकेन का? त्यावेळी मी त्याला धीर दिला. तु नक्की करु शकशील, फक्त जय श्रीराम म्हणं आणि कर. असं सांगितले. खर कौतुक हे विकास बेद्रे याचे आहे, त्याने पुरुष असूनसुद्धा महिलेच्या वेदना समजून घेतल्या अन् मदत केली, असंही त्या म्हणाल्या.
विकास बेद्रे यांचा थरारक अनुभव
"माझा मनामध्ये खुप भिती होती, पण देविका मॅमच्या साहाय्याने मला धाडस मिळाले. त्यांच्या सूचनेमुळेच मी हे करु शकलो. मी सिनेमॅटोग्राफर आहे, समोर दिसणारी गोष्ट हुबेहूब उतरवू शकतो, त्याचप्रमाणे सांगितलेली गोष्टही करुही शकतो, असा विश्वास होता. देविका मॅमच्या सूचनांनी मला आत्मविश्वास आला, आणि त्यामुळेच आज दोन जीव वाचले," असं विकास बेद्रे यांनी सांगितले.