नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह अॅडव्होकेट्स असोसिएशनची पहिली वार्षिक सभा संपन्न

    16-Oct-2025
Total Views |

Co-operative Advocates Association
 
ठाणे : ( Co-operative Advocates Association ) नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह अॅडव्होकेट्स असोसिएशनची पहिली वार्षिक सभा सी. बी. डी. बेलापूर येथे पार पडली. संस्थेच्या नोंदणीकृत स्थापनेनंतर झालेल्या या सभेला नवी मुंबईतील सहकार क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित वकिलांची उपस्थिती लाभली. सभेचे अध्यक्षस्थान असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. चंद्रकांत निकम यांनी भूषविले. संस्थेचे सचिव अॅड. डी. पी. साळुंखे यांनी सभेच्या अजेंड्यातील सर्व मुद्दे मांडले. अकरा प्रमुख विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले.
 
सभेत महिला दक्षता समितीची स्थापना, संस्थेचा लोगो प्रकाशन, नवीन बँक खाते उघडणे, वार्षिक अंदाजपत्रक सादर करणे, निधी उभारणी, लेखापरीक्षक नियुक्ती, उपसमित्यांची जबाबदारी निश्चित करणे अशा विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले. खजिनदार अॅड. स्मिता नेमाडे यांनी महिला वकिलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करत महिला दक्षता समितीची गरज व्यक्त केली. अध्यक्षांच्या परवानगीने या समितीची स्थापना करण्यात आली असून, अॅड. स्मिता नेमाडे, अॅड. विधी येनगे, अॅड. स्नेहल खेडकर, अॅड. मोनिका घेवडे आणि अॅड. सायली गोखले या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
अॅड. योगेश करंडे यांनी सहकार क्षेत्रातील कायद्याविषयी जनजागृती, गरजू नागरिकांना न्यायालयीन मदत आणि नवीन वकिलांना मार्गदर्शन या विषयांवर उपक्रम राबविण्याचे सुचवले. या सभेत सी.ए. नारायण भार्गव यांनी वकिलांना मार्गदर्शन करताना व्यावसायिक ताणतणावात मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
सभेस अॅड. कुंदन पाटील, अॅड. चंद्रकांत चौधरी, अॅड. महेंद्र रत्ना, अॅड. गौरव गोखले, अॅड. प्रतिक मिश्रा, अॅड. विठ्ठल ससाणे, अॅड. श्रीकांत चव्हाण, अॅड. विधी येनगे, अॅड. स्नेहल खेडकर, अॅड. मोनिका घेवडे यांसह अनेक वकील उपस्थित होते. अंतिम सत्रात अध्यक्ष अॅड. चंद्रकांत निकम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले तसेच सी.ए. नारायण भार्गव आणि कार्यक्रम नियोजनात सहकार्य करणारे श्री. वेदांत आंब्रे यांचे विशेष आभार व्यक्त केले.
 
 
- सागर देवरे