
मुंबई : ( Ghatkopar Fire Update ) घाटकोपर पश्चिम येथील 'गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क' ( Goldcrest Business Park ) नामक नऊ मजली व्यवसायिक इमारतीला सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग दुपारी २:३५ च्या सुमारास लागली असून, घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल ( Mumbai Fire Brigade ) घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीचे प्रमाण अधिक असल्या कारणाने, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम अजूनही सुरूच आहे.
महापालिका ( BMC ) आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ही आग गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क या व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यावर लागली. फायर अलार्म वाजताच इमारतीत काम करणारे अनेकजण इमारतीबाहेर पडले, मात्र अजूनही बरीच लोकं इमारतीत अडकली आहेत. अग्निशमन दलाच्या ( Mumbai Fire Brigade ) जवानांकडून त्यांना सुरक्षित इमारतीबाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
'गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क' ( Goldcrest Business Park ) ही पूर्णपणे व्यवसायिक इमारत असून, येथे अनेक खासगी कंपन्यांची कार्यालये आहेत. अग्निशमन दलाचे ( Mumbai Fire Brigade ) जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान अद्याप घटनास्थळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
कुर्ल्यात ( Kurla ) सकाळी आगीची दुर्घटना
आजच घडलेल्या दुसऱ्या आगीच्या घटनेत, कुर्ला ( Kurla ) पश्चिमेकडील कपाडिया नगर ( Kapadia Nagar ) येथील सीएसटी रोड येथील स्क्रॅपयार्डमध्ये पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली. ही घटना पहाटे २.४३ वाजता घडली आणि सकाळी ७.२४ वाजता आग विझवण्यात आली. सुमारे ३००० चौरस फूट परिसरात असलेल्या ऑटोमोबाईल्सचे सुटे भाग, टायर आणि इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्सच्या साठ्याला आग लागली होती. १५ ते २० गाले - ग्राउंड प्लस वन मजली इमारती आगीत जळून खाक झाल्या. शिवाय अधिकारी आगीचे कारण तपासत आहेत.