आयफेल टॉवर पाडणार?

    13-Oct-2025   
Total Views |
 
(Image Credit - Getty Image) Eiffel Tower 
 
पाश्चिमात्य जगतातील वास्तुकलेच्या वैभवाचे प्रतिबिंब ज्या शिल्पामध्ये दिसून येते, असे शिल्प म्हणजे आयफेल टॉवर. अनेकांसाठी हे प्रेमाचे प्रतीक आहे. सध्या समाजमाध्यमांमध्ये एका विषयावर चर्चा रंगली आहे ती अशी की, आयफेल टॉवर पाडणार की सुरक्षित राहणार? हजार फुटांपेक्षा उंच असलेल्या या मनोर्‍याला बांधायला लागलेले श्रम पाहता, याला पाडायचा विचार कुणी का बरं केला असावा? या चर्चेमागची सत्यता नेमकी काय आहे? याला असलेल्या फ्रान्समधील सामाजिक परिस्थितीची काही पार्श्वभूमी आहे का? हे सुद्धा लक्षात घेणे अनिवार्य आहे.
फ्रान्समध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. सरकारच्या काही धोरणांचा निषेध करत, तिथल्या काही कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. यामुळे सध्या आयफेल टॉवर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याच विषयावर भाष्य करताना, एका वृत्तपत्राने या घटनेवर उपहासात्मक टिप्पणी केली. ही टिप्पणी अशी होती की, “टॉवर बघायला येणार्‍या प्रेक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे, हे टॉवर पाडले जाणार.” समाजमाध्यमांमध्ये पराचा कावळा करणार्‍या लोकांनी अशा पद्धतीचा वृत्तांत ‘व्हायरल’ केला. त्यामुळे, आयफेल टॉवर पाडले जाणार नाहीत हेच सत्य.

                                                      हेही वाचा : सार्वभौमत्वाचे घोषणापत्र
आयफेल टॉवर हे केवळ एक शिल्प नसून, ती काळाच्या ओघात फ्रेंच संस्कृतीची तयार झालेली सांस्कृतिक ओळख आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फ्रेंच लोकांच्या अस्मितेचा ती अविभाज्य भाग बनली. १८८७ ते १८८९ या कालावधीमध्ये गुस्ताव आयफेल या अभियंत्रिकाने, या शिल्पाची निर्मिती केली. हे शिल्प तयार करण्याचे निमित्त होते, फ्रेंच राज्यक्रांतीची शंभरी. तत्पूर्वी १५० ते २०० मीटरपेक्षा जास्त उंच शिल्प, वास्तुकलेच्या ज्ञात इतिहासात तरी बांधले गेले नव्हते. गुस्ताव आयफेलच्या या संकल्पनेवर अपेक्षेप्रमाणेच मोठ्या प्रमाणात टीका झाली. काहींना हे शिल्प राक्षसी भासत होते, तर काहींच्या मते हा साधनांचा, वेळेचा, जागेचा अपव्यय आहे.
‘आर्टिस्ट अगेन्सट द आयफेल टॉवर’ या नावाने, जवळपास ३०० कलाकारांची समिती गठित करण्यात आली. या समितीने तत्कालीन शासनाला पत्रव्यवहार करत, आपली नाराजीही व्यक्त केली होती. या समितीमध्ये प्रख्यात लघुकथाकार गाए डि मोपासाँ यांचासुद्धा समावेश होता. सरतेशेवटी इजिप्तमधल्या पिरॅमिडसोबत तुलना करत त्यांच्या निर्मितीच्या टीकेवर उत्तर दिले, ज्यामुळे काहींचे मतपरिवर्तन घडले. काळाच्या ओघात तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आणि रेडिओ ट्रान्समिशनसाठी आयफेअल टॉवरचा उपयोग करण्यात आला.
१९०९ साली या टॉवरच्या दक्षिण स्तंभाजवळ कायमस्वरूपी रेडिओ सेंटरही तयार करण्यात आले होते. पहिल्याच विश्वयुद्धामध्ये आयफेल टॉवेरने, अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. जर्मनीची संप्रेषण प्रणाली ठप्प करून शत्रूची दाणादाण उडवून दिली. कालांतराने दुसर्‍या महायुद्धात हिटलरच्या सैन्याने फ्रान्सवर विजय मिळवला. जर्मनीचे सैन्य फ्रान्समध्ये शिरल्यानंतर काही सैनिकांनी, जाणीवपूर्वक आयफेल टॉवरच्या लिफ्टच्या तारा कापून टाकल्या. जेणेकरून जर्मन सैनिकांना शिड्यांचा वापर करावा लागेल.
१०० वर्षांहून अधिक काळ आजही जगात अनेकांसाठी आश्चर्य असणारी ही वास्तू, मागच्या दशकभरामध्ये मात्र अनेकदा काही काळासाठी का होईना बंद राहिली आहे. २०१५ साली पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, काही काळासाठी टॉवर बंद ठेवण्यात आले होते. २०१८च्या ऑगस्ट महिन्यात व्यवस्थापनामध्ये झालेल्या बदलांमुळे, टॉवरच्या बाहेर लोकांची भली मोठी रांग लागत होती. गर्दीला नियंत्रण करणे आवाक्याबाहेरचे असल्याने, कामगार युनियनने दोन दिवसाचा संप पुकारला होता. पुढच्याच वर्षी सुरक्षेच्या कारणास्तवही, काही काळासाठी तातडीने टॉवरमधून लोकांना बाहेर काढण्यात आले होते.
मार्च २०२० साली ‘कोविड’च्या महामारी आपसूकच सगळे जग थांबले, त्यामुळे टॉवरदेखील बंदच होते. आजमितीला फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कामगार संघटनांच्या आंदोलनामुळे दि. २ ऑक्टोबरपासून आयफेल टॉवर बंद आहे. अद्याप तरी ते अजून किती दिवस बंद राहील हे सांगता येत नाही. काहींनी यामुळे पर्यटनावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली आहे, तर काहींच्या मते या गोष्टी तात्पुरत्या आहेत. राष्ट्राची प्रतीके, सांस्कृतिक अस्मितेच्या सशक्त खुणा असतात. काळाच्या ओघात त्यांचे काय करायच याचा निर्णय, त्या त्या देशातील नागरिकांना घ्यावाच लागतो.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.