ट्रम्प यांची धामधूम

    09-Jan-2025   
Total Views |

DONALD TRUMP
 
जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेची निवडणूक जिंकल्यानंतर जगाची रचना पूर्वपदावर आणण्याचा चंग डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधला आहे. त्यालाच अनुसरून ते आक्रमक विधाने करत आहेत. मात्र, आजही त्यांचा प्रवास हा त्यांच्या सर्व नेतृत्वगुणांचा कस पाहणारा असेल, हे निश्चित...
 
अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर ५१वे राज्य होण्याचा दबाव आणण्यासाठी, आर्थिक शक्ती वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी त्यांनी लष्करी साहाय्य आणि व्यापार असमतोल या चिंतेच्या विषयांचा हवाला दिला. त्यांनी पुनरुच्चार केला की, कॅनडा आणि मेक्सिकोमधील वस्तूंवर भरीव कर लावण्याचा त्यांचा हेतू आहे. ट्रम्प यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये, पुन्हा एकदा कॅनडाला डिवचले आहे. पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कॅनडावर अमेरिकेचे ५१वे राज्य होण्यासाठी दबाव आणण्यासाठी ते आर्थिक निर्बंध लागू करतील. ट्रम्प यांनी असा युक्तिवाद केला की, अमेरिका कॅनडाला सबसीडी देते आणि त्याचवेळी चारचाकी वाहने व दुधासारख्या कॅनडाच्या उत्पादनांशिवाय, अमेरिकेचे फारसे काही अडत नाही. कॅनडा, आमच्या गाड्या, आमची कृषी उत्पादने, काहीही घेत नाही, म्हणून आम्ही त्यांची उत्पादनेही घेणार नाही, आम्ही मुळात कॅनडाचे रक्षण करतो. कॅनडियन लोकांची काळजी घेण्यासाठी आम्ही वर्षाला शेकडो अब्ज खर्च करत आहोत, यावर ट्रम्प यांनी विशेष भर दिला. एवढेच करून ट्रम्प थांबले नाहीत, तर त्यांनी कॅनडाचा समावेश असलेल्या अमेरिकेचा नकाशाही जारी केला. 
 
मात्र, ट्रम्प यांच्या वक्तव्यावर कॅनडाचे नेते संतापले आहेत. जस्टीन ट्रुडो यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि सांगितले की, याची कोणतीही दूरची शक्यता नाही. ट्रुडो यांनी ‘एक्स’वर लिहिले की, एकवेळ बर्फात आग लागेल, मात्र कॅनडा कधीही अमेरिकेचा भाग होणार नाही. आमच्या दोन्ही देशांचे कर्मचारी आणि समुदाय, एकमेकांचे सर्वात मोठे व्यापार आणि सुरक्षा भागीदार असल्याचा फायदा होतो. मात्र, याचा अर्थ विलीनीकरण होईल असा होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 कॅनडाचे विरोधी पक्षनेते पियरे पॉलीवेअर यांनीही ट्रम्प यांच्या प्रस्तावाचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, कॅनडा एक महान आणि स्वतंत्र देश आहे आणि अमेरिकेचा सर्वात चांगला मित्र आहे. परंतु, हे त्याच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात आहे. ट्रम्प यांनी निर्माण केलेल्या वादाचा परिणाम कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर तर होऊ शकतोच, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेच्या प्रतिमेवरही परिणाम होऊ शकतो. कॅनडा आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
पत्रकार परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी मेक्सिकोवर टीका केली आणि देशाने व्यापारात अमेरिकेचे शोषण केल्याचा आरोप केला. मेक्सिकोतील अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या टोळ्यांच्या हिंसाचाराकडेही त्यांनी लक्ष वेधले. अमेरिका मेक्सिकोला मोठ्या प्रमाणात अर्थसाहाय्य करते. मात्र, त्याचा लाभ अशा प्रकारे अमली पदार्थांच्या कार्टेलला होत असल्यास, यापुढे साहाय्य करण्यास अमेरिका बांधील नसल्याचे ते म्हणाले. ट्रम्प यांनी आपल्या दुसर्‍या कार्यकाळामध्ये मेक्सिको आणि कॅनडाविरोधात कठोर भूमिका घेण्याचे वचन दिले आहे. मेक्सिकोना अमेरिकेच्या सीमा ओलांडून, स्थलांतरितांचा आणि बेकायदेशीर अमली पदार्थांचा ओघ रोखला नाही, तर मेक्सिकोविरोधात आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या याच पत्रकार परिषदेत एक धक्कादायक घोषणा केली. ‘मेक्सिकोच्या आखाता’चे नाव बदलून ते ’अमेरिकेचे आखात’ करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याच पत्रकार परिषदेत त्यांनी पनामा कालवा आणि ग्रीनलॅण्ड ताब्यात घेण्याच्या मुद्द्याचाही पुनरुच्चार केला आहे. या दोन क्षेत्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, लष्करी बळाचा वापर करण्यास आपण नकार देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. या दोन्ही क्षेत्रांवर अमेरिकेचे नियंत्रण हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचे ट्रम्प म्हणाले. पनामा कालवा चीनकडून चालवला जात आहे, मात्र हा कालवा आम्ही पनामाला दिला होता. त्यामुळे या कालव्याचा आता दुरुपयोग होत असल्याचा ठपका ट्रम्प यांनी ठेवला आहे.
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांसाठी विजयानंतर केलेल्या सार्वजनिक भाषणात, गाझा येथील सुरू असलेल्या युद्धाचा थेट उल्लेख न करता, “मी युद्धे थांबवेन” असे म्हणाले. तसेच, “२०१७-२०२० दरम्यान, त्यांच्या अध्यक्षतेखाली कोणतेही मोठे युद्ध झाले नाही, ज्यामध्ये अमेरिकेचा सहभाग होता,” असे ते म्हणाले. जागतिक शांतता पुन्हा प्रस्थापित करण्याची त्यांची इच्छाशक्ती व्यक्त केली. ट्रम्प यांचा नवा कार्यकाळ हा अमेरिकेसह जगासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही प्रतिज्ञा प्राधान्याने पूर्ण करण्यावर ट्रम्प यांचा भर राहील. परिणामी, त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश इस्रायलसह सर्व बाह्य घटकांना दिल्या जाणार्‍या युद्धनिधीत कपात करणे आणि अमेरिकन लष्करी मदतनिधीवर मर्यादा आणणे हा असेल. त्यांच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी गाझामधील चालू युद्ध संपवण्याच्या हेतूचे, अनेकदा जाहीर विधान केले आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी ट्रम्प यांचे संबंध अस्पष्ट व गुंतागुंतीचे असले, तरी ट्रम्प त्यांच्यावर युद्ध संपवण्यासाठी दबाव आणू शकतात.ज्यामुळे इस्रायलमध्ये नेतान्याहूंवरील अंतर्गत दबाव वाढेल. जर गरज भासली, तर पर्यायी मार्ग म्हणून ट्रम्प नेतान्याहूंवर दबाव आणू शकतात. ट्रम्प यांची अरब देशांतील नेत्यांशी मजबूत संबंध ठेवण्याची प्रतिमा आहे. ज्यामुळे ते हमासवरही दबाव आणू शकतात. विशेषतः बंदिवासातील व्यक्तींच्या सुरक्षित सुटकेसाठी ते या दबावतंत्राचा वापर करू शकतात.
 
ट्रम्प यांचा मागील कार्यकाळ जलद निकालांना प्राधान्य देणार्‍या योजनाबद्ध लष्करी उपक्रमांच्या चर्चांनी गाजला होता. ज्यामध्ये त्यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ भूमिकेवर ठाम राहून काम केले. परंतु, इस्रायल-पॅलेस्टाईन प्रश्नावरील त्यांची भूमिका आणि ‘इराण अणू करारा’तून अचानक माघार घेणे यांसारखे त्यांचे भूतकाळातील निर्णय एक अस्थिर निर्णयक्षमतेचा आणि दीर्घकालीन राजनैतिक उपायांच्या अभावाचा परिचय देतात. मात्र, २०२४च्या निवडणुकीतील विजयाने मध्य-पूर्वेतील अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या नवीन टप्प्याची सुरुवात केली आहे. ज्यामध्ये प्रगती आणि अडचणी दोन्हींची शक्यता आहे. त्यांचा नवा ‘अमेरिका फर्स्ट दृष्टिकोन’ पश्चिम आशियातील अमेरिकेची उपस्थिती मर्यादित करण्यासाठी, प्रेरित करू शकतो. मात्र, त्याचवेळी गाझातील युद्ध संपवून शांततेचा करार घडवून आणण्याचे त्यांचे आश्वासन सत्यात उतरवणे इतकेही सोपे नाही. शेवटी, त्यांचा दुसरा कार्यकाळ परस्परविरोधी हितसंबंधांमध्ये समतोल राखण्याची आणि पश्चिम आशियातील राजकीय समीकरणांच्या नाजूक स्थितीतून मार्ग काढण्याची त्यांची क्षमता तपासेल, हे नक्की.