मुंबईत आढळला HMPVचा पहिला रुग्ण! ६ महिन्याच्या बाळाला लागण

    08-Jan-2025
Total Views |

HMPV
 
मुंबई : चीनमधील एचएमपीव्ही (HMPV) या विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे अन्य देशांसह भारताचीही चिंता वाढली आहे. २ दिवसांपूर्वी भारतात कर्नाटकातील बंगळुरूमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर याचे संशयित रुग्ण गुजरात, नागपूरमध्ये आढळून आले. अशातच आता मुंबईतही या विषाणूचा पहिला रूग्ण आढळल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील एका सहा महिन्याच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
सहा महिन्याच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण
 
पवई येथील हिरानंदानी रुग्णालयातील सहा महिन्याच्या बाळाला एचएमपीव्ही (HMPV) चा संसर्ग झाला आहे. मागील आठवड्यातच तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरु आहेत. संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्थानिक प्रशासनाला रुग्णासंदर्भातील माहिती दिली आहे. आतापर्यंत देशभरात ८ पेक्षा जास्त रुग्ण आढळले असून या विषाणूचा मुंबईतही शिरकाव झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.
 
HMPV व्हायरसमुळे टास्क फोर्सची स्थापना
 
एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसचे नागपूरमध्ये ७ वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलगी असे दोन रुग्ण आढळल्याने सरकार सरकार अलर्ट मोडवर असून जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी राज्यातील रुग्णालये सज्ज झाली आहे. तर आरोग्य विभागाकडून यासंदर्भात महत्त्वाची नियमावली जारी करण्यात आली आहे.