काठमांडू (Earthquake strikes Nepal) : दक्षिण तिबेट आणि नेपाळच्या सीमेलगतच्या भागात मंगळवार दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतात सुद्धा जाणवले. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत तब्बल ५३ माणसांना आपला जीव गमवावा लागला असून, ६० लोकं गंभीररित्या जखमी झाले आहेत. इमारतींना तडे गेले असून, अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सकाळी ६:३५ वाजता भूकंप झाला. यानंतर क्रमाने सकाळी ७:०२ वाजता दुसरा आणि ७:०७ वाजता तिसरा भूकंप झाला.
नेपाळमधील या भूकंपांच्या मालिकेचा भारतावरही परिणाम झाला आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार पाटणा आणि सारणसह बिहारच्या काही भागांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगाल आणि आसामच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये २०२५ची सुरूवात भूकंपाने झालेली असून एकाच आठवड्यात ३ वेळा भूकंप झाला आहे. या भूकंपानंतर अनेकांना २०१५ साली घडलेल्या भूकंपाची आठवण झाली. २०१५ सालचा भूकंप ७.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. यामध्ये एकूण ९००० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर २२,००० जणं जखमी झाले होते.