'विद्या भारती'च्या शाळेतही आता सीबीएसईचा अभ्यासक्रम

    07-Jan-2025
Total Views |

Vidya Bharti

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vidya Bharti CBSE Study)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विद्या भारतीच्या शाळेत सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. जयपूरच्या राजापार्कमध्ये असलेल्या 'आदर्श विद्या मंदिर' शाळेला यावर्षी मार्चमध्ये सीबीएसईकडून मान्यता मिळणार आहे. शाळेच्या वार्षिक उत्सवाबाबत माहिती देताना व्यवस्थापन समितीनेयाबाबत सविस्तर माहिती दिली.

हे वाचलंत का? : महाकुंभात भामट्यांचा सुळसुळाट; यूपी पोलिसांकडून भाविकांना सतर्कतेचा इशारा

शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सचिव संजीव भार्गव म्हणाले की, 'ते कॉन्व्हेंट संस्कृतीशी सहमत नाहीत, परंतु भाषेवर त्यांचा आक्षेप नाही. स्वतःला ओळखण्यात आणि सर्वसमावेशकतेने पुढे जाण्यात काहीही नुकसान नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा इतर देशांना भेट देतात तेव्हाही ते तेथील भाषांचा आदर करतात. त्यामुळे त्यांनी एखाद्या विशिष्ट भाषेचा अवलंब केला तरी ते विचारांपासून दूर जात आहेत, असे नाही. उच्च वर्ग बऱ्याचदा आपल्या मुलांना विद्या मंदिर शाळेत शिकविण्यास टाळाटाळ करताना दिसतात. त्यांना जोडण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, जेणेकरून आदर्श विद्या मंदिर आपल्या गौरवशाली इतिहासाची पुनरावृत्ती करू शकेल.' पुढे त्यांनी असे स्पष्ट केले की, इंग्रजी माध्यम केवळ पर्याय म्हणून असेल. याशिवाय हिंदी माध्यमही सुरू राहणार आहे.

व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष राजीव सक्सेना यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात २२ भाषांचा समावेश करण्यात आला असून प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याची तरतूद त्यात समाविष्ट करण्यात आली आहे. सीबीएसईनंतर आदर्श विद्या मंदिरातही हे नियम लागू होतील. आदर्श विद्या मंदिर भारतीय मूल्ये आणि आधुनिक शिक्षण देण्यावर विश्वास ठेवते.

वार्षिक सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
आदर्श विद्या मंदिराचा वार्षिक सोहळा बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी येथील प्रांत प्रचारक बाबूलाल यांचे उद्बोधन होईल. शाळेचे माजी विद्यार्थी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री सुनील बन्सल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्याचवेळी मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड हे कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या चरित्रावरील लघुनाटिकाही विद्यार्थी सादर करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर खेळात सहभागी होणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंना रौप्य पदक व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, तर राष्ट्रीय स्तरावर मल्लखांब व बॉक्सिंगच्या प्रत्येकी ४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाल्याबद्दल गौरविण्यात येणार आहे.