‘मॅडॉक फिल्म्स’चा मेगा धमाका

2025 ते 2028 ‘हॉरर कॉमेडी युनिव्हर्स’चीच हवा!

Total Views |
 
Maddock Films
 
नव्या वर्षात विविध विषयांवर आधारित मराठी, हिंदी, तामिळ, कन्नड भाषांमधील चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. 2025 साली काही नवे चित्रपट, तर काही चित्रपटांचे ‘सीक्वेल्स’ भेटीला येणार आहेत. या वर्षात नवे कोणते चित्रपट येणार, याकडे लक्ष वेधण्यापूर्वी जरा भूतकाळात डोकावूया. 2024 हे वर्ष खर्‍या अर्थाने ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपटांनी गाजवले. ‘स्त्री 2’, ‘मुंज्या’ या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावरच घेतले. ‘मॅडॉक फिल्म्स’ने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक आणि ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपट अधिक आवडत असल्याचे लक्षात घेत, 2025 आणि आगामी वर्षांमध्येही तब्बल आठ नव्या चित्रपटांची मेजवानी सादर करणार आहेत. जाणून घेऊयात ‘मॅडॉक फिल्म्स’च्या या चित्रपटांबद्दल...
 
 
 
2018 साली ‘मॅडॉक फिल्म्स’ने श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री’ या ‘हॉरर-कॉमेडी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. याच पठडीत येणारे ‘भेडिया’, ‘मुंज्या’ आणि ‘स्त्री 2’ अशा चित्रपटांची निर्मिती करीत त्यांनी ‘हॉरर-कॉमेडी युनिव्हर्स’ तयार केले. दरम्यान, ‘मॅडॉक फिल्म्स’ने 2025 ते 2028 सालच्या या चार वर्षांत ते नवे कोणते चित्रपट घेऊन येणार आहेत, याची यादी जाहीर केली आहे. 
 
- थामा- दिवाळी- 2025
- शक्ती-शालिनी - दि. 31 डिसेंबर 2025
- भेडिया 2 - दि. 14 ऑगस्ट 2026
- चामुंडा - दि. 4 डिसेंबर 2026
- स्त्री 3- दि. 13 ऑगस्ट 2027
- महा मुंज्या - दि. 24 डिसेंबर 2027
- पहला महायुद्ध- दि. 11 ऑगस्ट 2028
- दुसरा महायुद्ध - दि. 18 ऑक्टोबर 2028
 
प्राप्त माहितीनुसार, ‘थामा’ या चित्रपटात आयुष्यमान खुराना, रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल, अपारशक्ती खुराना यांच्या प्रमुख भूमिका असतील, तर ‘स्त्री 3’मध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी हे कलाकार तर असतीलच. पण, चित्रपटात एका प्रसंगात अक्षय कुमारची झलक दाखवल्यामुळे ‘स्त्री’ चित्रपटाच्या तिसर्‍या भागात अक्षय कुमारही झळकणार का, अशी शंका व्यक्त केली जात आहे, तर ‘मुंज्या 2’मध्ये अभय वर्मा, शर्वरी वाघ हे कलाकार तर असतीलच, याशिवाय अजून कोणते कलाकार झळकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ‘भेडिया 2’मध्ये वरुण धवन तर असेलच. पण, त्याच्याशिवाय अजून कोणते कलाकार असतील ते लवकरच कळणार आहे.
 
याशिवाय ‘मॅडॉक फिल्म्स’ ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ देखील भेटीला घेऊन येणार आहेत. ज्यात छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि पराक्रम दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले असून, अभिनेता विकी कौशल चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारी 2025 साली प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या पुढच्या चार वर्षांच्या मनोरंजनाची तजवीज ‘मॅडॉक फिल्म्स’ने केली असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘हॉरर-कॉमेडी युनिव्हर्स’ एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. दरम्यान, या भव्य घोषणेवर प्रतिक्रिया देताना, ‘मॅडॉक फिल्म्स’चे दिनेश विजान म्हणाले की, “मॅडॉकचा हेतू नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा आहे. आम्ही प्रेक्षकांच्या भावनांना भिडणारी पात्रे निर्माण केली आहेत, जी भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशात रुजली आहेत. हा दृष्टिकोन आमच्या कथा केवळ भावनिकच नव्हे, तर अर्थपूर्णदेखील बनवतो. आम्हाला असे एक ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ तयार करायचे आहे. ज्यामुळे अविस्मरणीय पात्रे आणि त्यांचे किस्से नव्या उंचीवर पोहोचतील.”
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.