...तर मी राजीनामा देणार! मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
29-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असल्यास त्यांनी राजीनामा मागावा. मी राजीनामा देणार, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवार, २९ जानेवारी रोजी दिली.
अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी नवी दिल्ली येथे पहिल्यांदाच केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. यावेळी राज्याचा अन्न आणि नागरी पुरवठ्यासंबंधी असलेल्या अडचणी आणि विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
धनंजय मुंडे म्हणाले की, "सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात जे कुणी दोषी असतील त्यांना फासावर चढवा ही माझी मागणी आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणात मी दोषी वाटत असल्यास त्यांनी राजीनामा मागावा. मी राजीनामा देणार. मी यात दोषी आहे किंवा नाही हे तेच सांगू शकतील."
"गेले ५१ दिवस मला टार्गेट करण्यात येत आहे. माझ्या लोकांबद्दल माझी नैतिकता प्रामाणिक आहे. या घटनेच्या बाबतीत मी आतापर्यंत प्रामाणिकपणे बोललो आहे. याबाबतीत मला स्वत:ला मी दोषी वाटत नाही. त्यामुळे वरिष्ठांनी माझा दोष सांगावा लागेल," असे ते म्हणाले.