शिवाजी पार्क मैदानातील प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणार!

23 Jan 2025 17:33:28
 
Shivaji Park
 
मुंबई : दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाची मोठी समस्या आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून हे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत.
 
महानगरपालिका प्रशासनाने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईतील पर्यावरण तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवाजी पार्क परिसरात मातीच्या धुलीकणांमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. अलीकडेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी प्रत्यक्ष मैदानात भेट दिली होती. शिवाजी पार्कमधील धुळीच्या समस्येवर १५ दिवसांत आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेला दिल्या होत्या. तसेच प्रभावी निराकरण पद्धती अंमलात आणून प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे निर्देशही त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला त्यांनी दिले होते.
 
हे वाचलंत का? -  गाळेधारकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी इमारतीचे बांधकाम वेगाने करा!
 
या पार्श्वभूमीवर धुळीमुळे होणाऱ्या प्रदुषणावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) येथे कार्यरत पर्यावरण तज्ज्ञ प्रा. वीरेंद्र सेठी यांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत यामध्ये आल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारच्या उपाययोजनांची शिफारस केली आहे.
 
यातील आल्पकालीन उपाययोजनांमध्ये धुलीकणांचे उत्सर्जन रोखण्यासाठी आणि वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे सुचवण्यात आले आहे. यात रोलर संयंत्राचा वापर करणे, धूळ नियंत्रणात ठेवून मैदानातील माती स्थिर ठेवण्यासाठी सातत्याने पाण्याची फवारणी करणे या बाबींचा समावेश आहे. दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने याची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यासोबतच वाऱ्याच्या प्रवाह, इतर संबंधित घटकांचा तपशीलवार अभ्यास करणे आणि त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही आधारित नियोजन करणे आदींचा दीर्घकालीन व्यापक उपाययोजनांमध्ये समावेश आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0