गाळेधारकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी इमारतीचे बांधकाम वेगाने करा!
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी : गोरेगावातील टोपीवाला महानगरपालिका मंडईला दिली भेट
23-Jan-2025
Total Views |
मुंबई : गोरेगाव स्थित टोपीवाला महानगरपालिका मंडईतील गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी इमारतीची बांधकाम प्रक्रिया वेगाने करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
गुरुवार, २३ जानेवारी रोजी त्यांनी गोरेगाव पश्चिम येथील प्रस्तावित टोपीवाला महानगरपालिका मंडईला भेट देत बांधकामाची पाहणी केली. यावेळी स्थानिक आमदार विद्या ठाकूर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, संचालक (अभियांत्रिकी) गोविंद गारूळे, नगर अभियंता महेंद्र उबाळे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि अभियंता उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की, "गाळेधारकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी इमारतीची बांधकाम प्रक्रिया वेगाने करावी. येत्या वर्षभरात ही जागा वापरासाठी यावी यासाठी प्रकल्पाशी संबंधित बाबींची अंमलबजावणी करावी. तसेच गाळेधारकांना दिलासा म्हणून पुनर्वसनाच्या अनुषंगाने सुरूवातीच्या टप्प्यात दोन मजल्यांचे बांधकाम पूर्ण करावे, त्यामुळे गाळेधारकांना ही जागा व्यवसायासाठी वापरणे शक्य होईल," अशा सूचना त्यांनी दिल्या.