ऊसतोड कामगार स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज!

21 Jan 2025 11:09:36
 
Neelam Gorhe
 
मुंबई : ऊसतोड कामगार स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अशी भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवार, १७ जानेवारी रोजी व्यक्त केली.
 
भारतातील मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनावर सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनने एक व्यापक संशोधन अहवाल सादर केला. यावेळी मासिक पाळी ते रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना येणाऱ्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मासिक पाळीत दुर्गम भागातील तसेच ऊसतोड कामगार महिलांना येणाऱ्या समस्यांबाबत वक्तव्य करून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. मुंबई प्रेस क्लब येथे हा कार्यक्रम पार पडला.
 
हे वाचलंत का? -  वरिष्ठ नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आवश्यक!
 
भारतातील १४ जिल्ह्यांमधील २० ते ४९ वयोगटातील मासिक पाळी येत असलेल्या महिलांच्या वांशिक डेटावर आधारित हा संशोधन अभ्यास आहे. कामासाठी स्थलांतरित जसे ऊस कारखाने, वीटभट्ट्या आणि खाणींमध्ये काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीत भेडसावणाऱ्या आव्हानांवर या अहवालात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर बीड, धारावी आणि पालघरसारख्या भागातील महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या त्रासावर या कार्यक्रमात विशेष चर्चा करण्यात आली.
 
याविषयी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "प्रत्येक स्त्रीच्या जीवनात मासिक पाळी येण्यापासून ते थांबण्यापर्यंतचा हा प्रवास अविस्मरणीय असतो. ही स्त्रियांच्या जीवनातील एक नैसर्गिक अवस्था आहे. खेड्यापाड्यात मासिक पाळीचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. ऊसतोड कामगार महिलांच्या या संदर्भातील समस्यांवर महाराष्ट्रात अनेक संस्था राज्य शासनाबरोबर काम करत आहेत. आपणही ऊसतोड कामगार विभाग, आरोग्य विभाग अशा चार ते पाच विभागांना अहवाल सादर करू," असे त्यांनी सांगितले.
 
पुढे त्या म्हणाल्या की, "स्त्री केंद्रित दृष्टिकोनातून विचार करत पुरुष वर्गाने यावरील मौन सोडले पाहिजे. स्त्रीला समजणे महत्त्वाचे आहे. पुरुषांना जर हे समजले तर त्यांना पाळी ते रजोनिवृत्तीपर्यंत सर्व समजून जाते. ऊसतोड कामगार महिलांमधील गर्भाशय शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढताना दिसते. ऊसतोडीच्या ठिकाणी असणारे कामाचे ओझे, स्वच्छतेच्या सोयींचा अभाव, मासिक पाळीच्या काळात काम करण्याची सक्ती यामुळे वारंवार उद्भवणारी गर्भाशयाशी संबंधित दुखणी त्यामुळे होणारे गर्भपात, खासगी दवाखान्यातील महागडे उपचार, शस्त्रक्रियेनंतर होणारी आरोग्याची हेळसांड या प्रश्नांकडे आपण प्रामुख्याने पाहणे आवश्यक आहे," असेही त्या म्हणाल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0