वरिष्ठ नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आवश्यक!

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

    21-Jan-2025
Total Views | 46
 
C. P. Radhakrishnan
 
मुंबई : वरिष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवार, १८ जानेवारी रोजी केले.
 
मुंबईतील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टच्या 'सुकून निलाय पॅलिएटिव्ह केअर सेंटर'च्या विस्तार प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पालिकेच्या वैद्यकीय संचालक डॉ. निलम आंद्राडे, ट्रस्टचे विश्वस्त आणि देणगीदार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ. एरीक बार्जेस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी ट्रस्टच्या आवारात कॅन्सर व्यतिरिक्त इतर गंभीर आजारांच्या रुग्णांना विनामूल्य सेवा देणाऱ्या इमारतीच्या छताच्या नविनीकरण प्रकल्पाचे आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
 
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, "आरोग्यसेवा क्षेत्रातील क्रांतिकारक बदल आणि जीवनमानातील सुधारामुळे देशातील लोकांचे सरासरी आयुष्यमान वाढले आहे. भारतात सन २०५० पर्यंत साधारण ३४ कोटी वरिष्ठ नागरिक असतील असा अंदाज वर्तविण्यात आला असून अमेरिकेच्या लोकसंख्येइतके वरिष्ठ नागरिक एकट्या भारतात असतील. त्यामुळे यादृष्टीने नियोजन करून वरिष्ठ नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा निर्माण करणे तसेच अद्ययावत करणे आवश्यक आहे. आज युवा असलेली व्यक्ती उद्या वरिष्ठ नागरिक होणार आहेत. त्यामुळे हे लक्षात घेऊन प्रत्येक युवा व्यक्तीने ज्येष्ठांची सेवा केल्यास उद्या स्वतःला गरज पडेल त्यावेळी इतर लोक आपली सेवा करतील," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्ट ही गरीब, निराधार व्यक्ती आणि रुग्णांसाठी उत्कृष्ट कार्य करीत आहे. दानशूर व्यक्तींनी या संस्थेला मदत करावी. परंतू, केवळ पैशाने मदत करणे पुरेसे नाही, तर लोकांनी आपला थोडा वेळसुद्धा सेवेसाठी दिला पाहिजे," असे आवाहन करत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच ट्रस्टमार्फत गरजू लोकांसाठी सुरू असलेल्या विविध कामांचे कौतुक केले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121