सातारा : आमच्यात कोणतीही नाराजी नसून पालकमंत्रीपदावर लवकरच मार्ग निघेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, २१ जानेवारी रोजी स्पष्ट केले. त्यांनी साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी गावी आलो की, लोक म्हणतात नाराज आहे. पण नवीन महाबळेश्वरचा हा मोठा प्रकल्प आहे. त्याच्या मागे मी लागलेलो आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मला अनेकदा गावी यावे लागेल. प्रतापगडापासून तर अगदी पाटणपर्यंत २३५ गावे या प्रकल्पात अंतर्भूत आहेत. आता आणखी २९५ गावांनी याची मागणी केली आहे. त्यामुळे या जिल्ह्याची पर्यटन जिल्हा म्हणून ओळख निर्माण होईल. इथला भूमिपूत्र म्हणून मला त्यासाठी लागणारे कष्ट घ्यावे लागतील. या भागाचा कायापालट करणे हे एकच माझे उद्दिष्ट आहे. या भागाचा विकास करणे, इथल्या लोकांच्या जीवनात बदल घडवणे, इथला इतिहास आणि संस्कृती जोपासने आणि ती वाढवणे हादेखील आमचा उद्देश आहे," असे त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का? - दावोसमध्ये कॉग्निझंटचे सीईओ रवी कुमार एस यांच्याशी मुख्यमंत्र्यांची बैठक!
ते पुढे म्हणाले की, "रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर मार्ग निघेल. तिकीटवाटपापासून तर आतापर्यंतचे सगळे प्रश्न सुटले आहेत. पालकमंत्र्यांचाही प्रश्न लवकर सुटेल. भरत गोगावले यांनी रायगडमध्ये अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे अपेक्षा ठेवणे आणि मागणी करणे यात चुकीचे नाही. महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही बसून मार्ग काढू," असेही ते म्हणाले.