नवी दिल्ली : व्हानुआतू या प्रशांत महासागरावर वसलेल्या एका छोट्याश्या बेटाला १७ डिसेंबर रोजी भूकंपाने हादरून सोडले. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपामुळे १४ लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो जणं जखमी झाली आहेत. अशातच आता परिस्थीती बिकट असताना, या देशाला भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. व्हानुआतूला आपले जनजीवन पुन्हा एकदा रूळावर आण्ण्यासाठी भारत तब्बल ५ लाख डॉलरची मदत करणार आहे. फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड कोओपरेशन (FIPIC) यात दोन्ही देश भागीदार असल्यामुळे भारताने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
१७ डिसेंबर रोजी वानुआतु बेटावर झालेल्या भूकंपामुळे, मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. अनेक वाहनांचे यामध्ये नुकसान झाले असून इमारतींना सुद्धा याचा फटका बसल्याचे बोलले जात आहे. भारताने मृत झालेल्या नागरिकांप्रती दिलगीरी व्यक्त केली तसेच, शक्य होईल त्या त्या प्रकारे भारताकडून मदत केली जाईल असे भारताकडून सांगण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्रालयाने दिली. वानुआतु सारख्या देशांमध्ये झालेल्या भूकंप आणि सुनामीच्या वेळेस भारत कायमच मदतीसाठी तत्पर राहिला आहे.आपत्ती व्यवस्थापन हा इंडो-पॅसिफिक ओशन इनिशियेटीव (IPOI) चा महत्वाचा स्तंभ आहे असल्याचे परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे.
चीनच्या विस्तारवादी भूमिकेला शह देण्यासाठी भारताने प्रशांत महासागरातील देशांच्या हिताचे निर्णय घेतले आहे, प्रसंगी त्यांना अर्थसाह्य सुद्धा केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांनी एकत्र येत प्रशांत महासागरातील अनेक देशांना मदतीचा हात पुढे केला आहे.