मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Durg Pradarshan Sohla) 'शिव स्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान'च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी 'दुर्ग प्रदर्शन सोहळा' आयोजित केला होता. गेली बारा वर्षे ते हा उपक्रम राबवत आहेत. दि. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत श्री. शंकर मंदिर, आनंदगड, पार्कसाईट, विक्रोळी (प) येथे दुर्ग प्रदर्शन आयोजित केले होते. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षपूर्तीनिमित्त २१ फूट लांब व ९ फूट रुंद रायगडाची प्रतिकृती ही यंदाचे विशेष आकर्षण होते.
हे वाचलंत का? : काच दिवशी एकाच वेळी २ लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण, महाभारतावर परीक्षा
यासोबतच शिवकालीन शस्त्र, नाणी, पत्र यांचा संग्रह अन् याखेरीज शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिवतेज जागृत करण्यासाठी शिवचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा ‘श्री शिव चैतन्य स्पर्धा' याचेही आयोजन करण्यात आले होते. या दुर्ग प्रदर्शन सोहळ्याला विभागातील तसेच समस्त मुंबईमधील शिवप्रेमींनी, इतिहास प्रेमींनी उपस्थिती दर्शविली होती.
दि.१२ जानेवारी रोजी सामूहिक ध्वजारोहणाने प्रदर्शनाची सुरुवात झाली. दि. १३ जानेवारी रोजी (पौष पौर्णिमा) माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव निमित्त 'सामूहिक वंदना' देण्यात आली. दि. १४ जानेवारी रोजी पानिपत शौर्य दिनानिमित्त 'ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन' भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. दि. १५ जानेवारी रोजी विभागातील शालेय मुलांसाठी 'श्री शिवचैतन्य स्पर्धा' पार पडली. दि. १६ जानेवारी रोजी धर्मवीर शंभूराजांच्या राजाभिषेक दिनानिमित्त सामूहिक शंभूवंदना तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.